मेट्रो आजपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत; मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर मार्गावर धावणार

मेट्रो आजपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत; मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर मार्गावर धावणार
Published on
Updated on

नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबई मेट्रोला अखेर मुहर्त मिळाला असून शुक्रवारी १७ नोव्हेंबरपासून ती नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. मार्ग क्रमांक एक असलेल्या बेलापूर ते पेंधर या स्थानकांदरम्यान ही मेट्रो धावणार आहे. ही सेवा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला दिले. त्यानुसार लोकार्पण सोहळा न करता थेट मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ होणार आहे, या मेट्रोचे किमान तिकीट दहा रुपये तर कमाल तिकीट चाळीस रुपये असेल.

पेंचर ते बेलापूर या ११ किमीच्या प्रकल्पासाठी १३ वर्षांचा कालावधी लागला. या मेट्रो लाईन एकसाठी सिडकोने ३०६३.६३ कोटी रुपये खर्च केला आहे. मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन १ मे २०११ रोजी पार पडले होते. हा प्रकल्प पूर्णत्वास यावा म्हणून तत्कालीन सिडको एमडी डॉ. संजय मुखर्जी यांनी महामेट्रोची नियुक्ती केली होती. ११ किमी मेट्रो प्रवास वाहतुकीसाठी रेल्वे सुरक्षा विभागाची मंजुरी घेण्यात आली. त्यामध्ये बेलापूर टर्मिनल, आरबीआई कॉलनी, बेलपाडा, उत्सव चौक, केंद्रीय विहार, खारघर गाव, सेंट्रल पार्क, पेठपाडा, अमनदूत, पेठाली (तळोजा) आणि पेंचर या स्थानकाचा समावेश आहे. सिडकोने मेट्रो सेवेचे उ‌द्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होणार होते. मात्र त्यांच्या कार्यक्रमात बदल झाल्याने हे उद्घाटन थांबले. मेट्रोचे काम, सुरक्षा प्रमाणपत्र, चाचणी होऊन वर्ष पूर्ण झाले. केवळ मेट्रो स्थानकात विद्युत रोषणाईचा झगमगाट दिसून येत होता. गेल्या १५ दिवसांपूर्वी मेट्रोचे काम पाहणाऱ्या अभियंत्यांना पाहणी दौन्यात काही त्रुटी आढळून आल्यानंतर त्यात तातडीने सुधारणा करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले होते.

या प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग विकसित करण्यात येत आहेत. सिडकोने पाहिल्या टप्प्यात बेलापूर ते पॅधर या ११.१० किमी लांबीच्या मार्ग क्र. १ चे काम हाती घेतले होते. या मार्गावर एकूण ११ स्थानकांसह तळोजा पंचनंद येथे आगार (डेपो) आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा, इमर्जन्सी ब्रेक इ. चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडल्या व त्याबाबतचे प्रमाणपत्रही संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाले. सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेली सीएमआरएस (मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त) यांच्यातर्फे केलेली चाचणी यशस्वीरीत्या पार पडून मार्ग क्र. १ वर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी सीएमआरएस यांचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले.

मेट्रोद्वारे नवी मुंबई अंतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामध्ये मेट्रो मार्गाचे जाळे निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे मेट्रोच्या अंमलबजाणीचे काम प्रभावीपणे सुरू आहे.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार असून सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्सना मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहर या लौकिकाला साजेशी उत्तम आणि सक्षम परिवहन व्यवस्था मेट्रोद्वारे निर्माण होणार आहे.

– अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फूटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात दुकार्नाकरिता जागा.

दर १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार

पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पॅधरदरम्यान दुपारी ३ वाजता सुरू होऊन शेवटची फेरी रात्री १० वाजता असणार आहे, तर दि. १८ नोव्हेंबर शनिवारपासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री १० वाजता होणार आहे. या मार्ग क्र. १ वर दर १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news