विक्रम गोखले, "कंगना जे म्हणाली ते खरंय. स्वातंत्र्य भिकेनेच मिळालंय" | पुढारी

विक्रम गोखले, "कंगना जे म्हणाली ते खरंय. स्वातंत्र्य भिकेनेच मिळालंय"

मुंबई, पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री कंगनाने स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही नेत्यांनी कंगनाला मिळालेला पद्मश्री पुरस्कार मागे घ्यावा, अशी मागणी देखील केली; कंगनाच्या समर्थनार्थ आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुढे आले आहेत. त्यांनी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांचे थेट समर्थन केलेले आहे.

७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने पत्रकारांशी विक्रम गोखले बोलत होते. यावेळी त्‍यांनी कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे कौतुक केलं. त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरं होईल, असंही ते म्हणाले. “कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले”, असा गंभीर आरोपही विक्रम गोखले यांनी केला.

“कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे. राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे, काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्दुैव आहे. बाबरापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाहीत, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही”, असेही विक्रम गोखले म्‍हणाले.

“लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो; पण त्यांची जयंती ही २ ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे. जे ७० वर्षात झालं नाही ते पंतप्रधान मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करतात. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेनही”, असंही त्‍यांनी या वेळी स्‍पष्‍ट केले.

पाहा व्हिडीओ : भाऊंमुळेच ‘लालपरी’ रस्त्यांवरून धावते !!!

Back to top button