मेल-एक्स्प्रेस मधील तिकीट दरात ३०% घट | पुढारी

मेल-एक्स्प्रेस मधील तिकीट दरात ३०% घट

मुंबई/नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक पूर्वीप्रमाणे सामान्य वेळापत्रकानुसार चालवण्यात येणार असून, तिकीट दरही पूर्ववत करण्यात आल्यामुळे रेल्वे प्रवास स्वस्त झाल्याची आनंदवार्ता आहे. मेल-एक्स्प्रेस च्या तिकीट दरात तब्बल 30 टक्क्यांनी घट होणार आहे.

अर्थात रेल्वे स्वस्ताईचा हा निर्णय कधीपासून अमलात येणार याचा मुहूर्त रेल्वेने जाहीर केलेला नाही. मात्र, येत्या काही दिवसांतच हा निर्णय अमलात येईल, असे रेल्वे मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटले आहे. या निर्णयानुसार 1700 पेक्षा अधिक मेल-एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणे धावणार आहेत. रेल्वे प्रवास करताना कोरोनाचे सर्व नियम लागू असतील. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून रेल्वेसेवा बंद होती. पण देशातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कोरोनाकाळामध्ये विशेष रेल्वेसेवा सुरू केली होती.

पण आता कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासावरील निर्बंधही आता उठवले आहेत. लांब पल्ल्याचा प्रवास करणार्‍या प्रवाशांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने हळूहळू सर्व निर्बंधांमध्ये सूट देण्यास सुरुवात केली आहे. अशामध्ये रेल्वे मंत्रालयानेदेखील प्रवाशांसाठी मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

* आतापर्यंत कोरोना काळात विशेष तिकीट दरानुसार रेल्वे धावत होत्या. आता त्यांचे दर आता सामान्य होतील.
* यापुढे जनरल तिकीट असलेली सिस्टम बंद होईल. म्हणजेच जनरल क्लासचे कोणतेही तिकीट प्रवाशांना यापुढे मिळणार नाही.
* फक्त रिझर्व्ह आणि वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी असेल.
* बुक केलेल्या तिकिटावर कोणतेही अतिरिक्त
* शुल्क आकारले जाणार नाही.

आगाऊ आरक्षित तिकीट दरांचे काय?

रेल्वेच्या परिपत्रकानुसार, आधीच आगाऊ आरक्षित केलेल्या तिकिटांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार नसून अतिरिक्त शुल्क पुन्हा प्रवाशांना देण्यातही येणार नाही. विशेष ट्रेन म्हणून विशेष तिकीट दर आकारण्यात आले होते. या रेल्वेचे तिकीट दर प्री-कोविड काळातील असणार आहेत.

Back to top button