मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट? | पुढारी

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा कट?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत येत्या काही दिवसांत बॉम्बस्फोटांची भीषण मालिका घडविण्याचा कट आखण्यात आला असून या कटाचा मुख्य सूत्रधार जावेद नावाची व्यक्ती आहे. त्याच्यावरच या बॉम्बस्फोटांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, अशी माहिती दुबईत राहणार्‍या एका मुंबईकराने शनिवारी खास फोन करून वांद्रे रेल्वे पोलिसांना दिली.

या माहितीची शहानिशा सुरू असून, शहरात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानके, शासकीय इमारती, धार्मिक स्थळांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत प्रमुख रेल्वे स्थानकांची श्वान पथकाच्या मदतीने शनिवारी कसून तपासणी करण्यात आली.

उपनगरीय लोकलवर संभाव्य हल्ल्याची शक्यता असल्याने रेल्वे पोलिसांनी प्रमुख रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्तात वाढ केली आहे. स्थानिक पोलिसांनी जास्तीत जास्त कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे आदेशही पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत. संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घ्या, त्यांची कसून चौकशी करा, असेही पोलीस आयुक्तांनी बजावले.

विजय दुबे (पोलिसांच्या विनंतीवरून नावात बदल केला आहे) हे कांदिवली परिसरात राहतात. सध्या ते नोकरीनिमित्त दुबईत वास्तव्यास आहेत. शनिवारी दुपारी त्यांनी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याच्या दूरध्वनी क्रमांक 026422047 वर कॉल केला. माहिती देण्यापूर्वी स्वत:चे नाव, राहण्याचा पत्ता आणि दुबईतील कामाविषयी माहिती दिली. स्वत:ची ओळख दिल्यानंतर विजय यांनी हा कट उघड केला.

जावेद नावाची एक व्यक्ती मुंबई शहरात बॉम्बस्फोटाची मालिका घडविण्याच्या तयारीत असून, एक दक्ष नागरिक म्हणून आपण ही माहिती देत असल्याचे ते म्हणाले. वांद्रे पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षासह रेल्वेच्या नियंत्रण कक्षालाही ही माहिती दिली. दहशतवाद विरोधी पथकालाही (एटीएस) सतर्क करण्यात आले. दुबईहून मिळालेली माहिती किती खरी याची शहानिशा स्वत: एटीएसकडून सुरू आहे. गुप्तचर विभागाकडून असा काही निरोप मधल्या काळात आला का, हे देखील तपासले जात आहे.

Back to top button