मुंबई : पुढारी वृत्तसेवा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर आज (बुधवार) सकाळी दोन अज्ञातांनी दगडफेक करून गाडी फोडल्याची घटना घडली. आकाशवाणी आमदार निवासस्थानाबाहेर घडलेल्या या घटनेनंतर येथील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
मंत्रालयाच्या गार्डन गेटच्या बाजूला असलेल्या आमदार निवासाच्या खाली मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी उभी होती. दोन मराठा आंदोलकांनी मुश्रीफांची गाडी हेरुन तिची तोडफोड केली. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. येथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ आक्रमक मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले.
तोडफोडीच्या घटनेने येथे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात पोलीस फौटफाटा वाढवण्यात आला आहे. तसेच, हसन मुश्रीफांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानाबाहेरही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंत्रालयातही येणाऱ्यांची चौकशी केल्यानंतरच त्यांना आत सोडले जात आहे. दरम्यान, गाडीची तोडफोड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना, मी सुरक्षित आहे. ज्यांनी माझ्या गाडीची तोडफोड केली, त्या तरुणांना सोडून द्यावे. त्यांना कोणतीही शिक्षा करू नये, अशी माझी विनंती आहे. मराठा समाज हा आमचाच समाज आहे. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहोत. मंत्र्यांची घरे जाळणे हे अत्यंत गंभीर आहे. यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.
मराठा आंदोलकांनी काही दिवसांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीचीही तोडफोड केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन भोईवाडा पोलिसांनी मंगेश संजय साबळे (वय २५) यांच्यासह वसंत शामराव बनसोडे (३२) आणि राजू प्रकाश साठे (३२) यांना अटक केली होती.