आफ्रिकेचा मलावी हापूस एपीएमसीत दाखल | पुढारी

आफ्रिकेचा मलावी हापूस एपीएमसीत दाखल

नवी मुंबई ; राजेंद्र पाटील : पूर्व आफ्रिकेच्या मलावी येथील हापूस आंबा गेल्या चार वर्षांपासून मुंबईवारी करत आहे. गुरुवारी हवाई मार्गाने या मलावी हापूस आंब्यांच्या 230 पेट्या एपीएमसीमध्ये दाखल झाल्या. हवाई प्रवास खर्च आणि आयात शुल्क वाढल्याने मलावी हापूस किलोमागे गेल्या वर्षीपेक्षा 200 ते 500 रुपये महागला आहे.

दरवर्षी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरदरम्यान मलावी येथील हापूस मुंबई एपीएमसीत मागवला जातो. गेल्या तीन वर्षांत 35 हजार पेट्या मुंबईत विक्री झाल्या. मलावी हापूस ही जात तशी कोकणातील हापूसची. या आंब्याची चवदेखील कोकण हापूस सारखी असून रंग, आकारही मिळताजुळता आहे.

मलावी येथील काही शेतकर्‍यांनी कोकणातील हापूसच्या काड्या मलावी येथे नेऊन त्या कलम करून मलावी हापूसच्या आंब्याची लागवड केली. 400 एकरमध्ये ही लागवड झाली असून एका एकरात 400 हापूसची झाडे लावली आहेत.

मुंबईतील घाऊक व्यापारी संजय पानसरे हे मलावी हापूस गुजरात, दिल्ली, मुंबई, पुणे आणि कलकत्ता या राज्यांत आणि जिल्ह्यांत विक्रीसाठी पाठवतात. हवाई खर्चात आणि आयात शुल्कात झालेल्या वाढीव खर्चामुळे मलावी हापूसचे दर 1200 ते 1500 रुपये किलो असतील, असे त्यांनी सांगितले.

* मलावी म्हणजे आपल्या कोकण हापूसचे कलमी रोप
* 400 एकरात मलावी हापूसची आफ्रिकेत लागवड
* आठवड्यातून दोनवेळा येणार मलावी
* 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर एक महिना हंगाम

Back to top button