ST Workers strike : संप माेडून काढण्याची एस.टी. महामंडळाची तयारी | पुढारी

ST Workers strike : संप माेडून काढण्याची एस.टी. महामंडळाची तयारी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला आणि राजकारण शिरलेला एस.टी. कामगारांचा संप (ST Workers strike) येत्या चार दिवसांत मोडून काढण्याची तयारी राज्य शासनाने केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कर्मचार्‍यांना निलंबित करणे, त्यानंतरही कामावर न आल्यास पगार बंद करणे आणि प्रशिक्षण पूर्ण झालेले सुमारे अडीच हजार नवे कर्मचारी सेवेत उतरवणे, अशी त्रिसूत्री वापरून हा संप मोडून काढण्याची तयारी एस.टी. महामंडळाने चालवली आहे.

दरम्यान, महामंडळाने गुरुवारी 1,135 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली. ही संख्या 2,053 वर पोहोचली आहे. संपाचा तिढा कायम असून, एस.टी. सेवा शंभर टक्के कोलमडली.

राज्य शासनात विलीनीकरण करा, अशी एस.टी. कामगारांची मुख्य मागणी आहे. पगार आणि महागाई भत्त्याविषयीच्या मागण्या राज्य सरकारने आधीच मान्य केल्या आहेत. विलीनीकरणाच्या मागणीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीने आपला अहवाल तीन महिन्यांत द्यायचा आहे. (ST Workers strike)

विलीनीकरणाचा मुद्दा असा न्यायालयीन कक्षेत अडकल्याने संपाची मुख्य मागणीच एकप्रकारे न्यायप्रविष्ट झाली. परिणामी, संपाची मुख्य मागणी रेटून धरणे म्हणजे न्यायालयाचा अवमान ओढवून घेणारे ठरणार आहे. तशी अवमान याचिकाही राज्य शासनाने दाखल केली आहे.

शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणे व्यवहार्य नसताना संप लांबवून शासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच अवमान याचिकेवरील सुनावणीपर्यंत मोठ्या संख्येने कामगारांवर कारवाईचा बडगा उगारून संप मोडीत काढण्याचे प्रयत्न महामंडळाकडून केले जातील, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. अनेक कामगार कामावर येण्यास इच्छुक असून, विरोधकांकडून त्यांची अडवणूक केली जात असल्याने पोलीस संरक्षण देण्याची तयारी परिवहनमंत्री अनिल परब यांनी दर्शवली आहे. (ST Workers strike)

पगाराची रसद तोडणार

कामगारांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने अधिक काळ संप सुरू ठेवणे, कामगारांनाही परवडणारे नाही, अशी महामंडळाची समजूत आहे. त्यानुसार या कामगारांची पगाराची आणि प्रसंगी नोकरीचीच रसद तोडण्याची तयारी महामंडळाने सुरू केली आहे. निलंबित केलेले कामगार कामावर न आल्यास त्यांना अर्धे वेतनही मिळणार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत ठाणे विभागात एकूण 70 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

प्रशिक्षित कामगार उतरवणार

कामगारांचा संप मोडीत काढण्यासाठी महामंडळ प्रशिक्षण घेणार्‍या नवनिर्वाचित चालक कम वाहक कामगारांची मदत घेण्याची शक्यता आहे. नव्या भरतीसह अनुकंपा तत्त्वावर महामंडळाने सुमारे दोन ते अडीच हजार कामगारांची भरती केलेली आहे. त्यांचे प्रशिक्षण जवळपास पूर्ण झालेले आहे. अशा कामगारांना आता रस्त्यावर उतरून संप मोडण्याचा आणखी एक पर्याय महामंडळाकडून चाचपला जात आहे.

या संपाला विरोध करणार्‍या संघटनाही आता भाजपविरोधात एकवटल्या असून, हा उत्स्फूर्तपणे पुकारला गेलेला संप भाजपने हायजॅक केल्याचा आरोप कामगार संघटनांकडून केला जात आहे. परिवहनमंत्री परब यांनीही कामगारांच्या आंदोलनावर राजकीय पोळी शेकू नका, अशा शब्दांत भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

संपाची तीव्रता कमी होतेय!

पोलीस आणि परिवहन विभागाच्या मदतीने एस.टी. महामंडळाने बुधवारी 2 हजारांहून अधिक खासगी ट्रॅव्हल्स बसेस, खासगी वाहने आणि इतर वाहनांच्या रूपात हजारो प्रवाशांची गैरसोय दूर केली. त्यात गुरुवारी काही कामगार वसई आगारासह पुणे आगारातून गाडीबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. गुरुवारी दिवसभरात 37 खासगी वाहने विविध आगारांमधून सुटली.

मात्र, गाड्यांची तोडफोड करून आणि कामगारांच्या तोंडाला काळे फासून संप वाढवण्याचा राजकीय प्रयत्न सुरू आहे. परिणामी, कामावर रुजू होणार्‍या कामगारांना विश्‍वासात घेऊन आणि पोलीस संरक्षण घेऊन मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू करत महामंडळ संपाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

* मोठ्या संख्येने कामगारांवर निलंबनाची कारवाई केली जाईल.

* एसटी डेपोंमधील कामगारांचे बस्तान हलवले जाईल. जेणेकरून कामगारांसमोर निवार्‍याचा प्रश्न निर्माण होईल.

* निलंबित कामगारांनी हजेरी लावली नाही, तर अर्धे वेतनही देणार नाही.

* एसटी डेपोंमधून प्रवाशांच्या सुविधेसाठी खासगी बसेस व वाहने सोडण्याचे नियोजन केले जाईल. त्यामुळे संपाची तीव्रता कमी होईल.

* नवीन भरतीमधील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सुमारे 2 हजार कामगारांना कामावर रुजू करण्याचे नियोजन सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळेल व महामंडळाचे उत्पन्न पुन्हा सुरु होईल.

* एसटी कामगारांच्या कृती समितीमध्ये असलेल्या विविध कामगार संघटनांना विश्वासात घेऊन त्यांचे सदस्य असलेल्या कामगारांना कामावर रुजू केले जाईल. जेणेकरून संपात फूट पडून संप मोडीत निघेल.

खासगी प्रवासी सेवा

एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटीच्या डेपोंमधून प्रवासी वाहतूक करणार्‍या खासगी बसेसची तोडफोड झाल्यानंतर भीतीपोटी खासगी बसचालकांनी गुरुवारी प्रवासी वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पोलीस संरक्षणाशिवाय डेपोंमधून प्रवासी वाहतूक करण्यास नकार दिला होता. अखेर परिवहन मंत्र्यांनी पोलीस महासंचालकांसोबत चर्चा करून संरक्षण देण्याचे आश्वासित केल्यानंतर खासगी बसचालकांनी प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

दोन ‘शिवशाही’ची तोडफोड

मुंबई नाका परिसरातील महामार्ग बसस्थानक येथे उभ्या असलेल्या दोन शिवशाही बसेसवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी दगडफेक केली. या तोडफोडीत बसच्या काचेसह इतर नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

आतापर्यंत 2053 निलंबित

संपाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी 1135 कर्मचारी निलंबित करण्यात आले. त्यामुळे निलंबित झालेल्या कर्मचार्‍यांची संख्या 2053 वर पोहोचली आहे. निलंबनाचे सर्वाधिक प्रमाण पुणे (138), जळगाव (91), ठाणे (73), बीड (67), अकोला (66), मुंबई (64), रायगड (63), नाशिक (54), धुळे (54), सांगली (44) या जिल्ह्यांमध्ये आहे.

Back to top button