मध्य महाराष्ट्र, कोकणात ‘यलो अलर्ट’

यलो अलर्ट

मुंबई/पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सलग तिसर्‍या दिवशी थंडीचा कडाका कायम आहे. लागोपाठ पुणे शहराचा किमान तापमानाचा पारा नीचांकी गेला आहे. राज्यातील इतर शहरांपेक्षा पुण्याचे किमान तापमान सरासरी 4.8 अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. दरम्यान, 12 ते 15 नोव्हेंबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात पाऊस पडणार आहे. या भागासाठी हवामान विभागाने ’यलो अलर्ट’ जारी केला आहे.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले असून, हा तीव्र कमी दाबाचा पट्टा तमिळनाडूच्या किनारपट्टीकडे सरकला आहे. या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कायम राहणार असून, हा पट्टा तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडील करायकल व श्रीहरी कोटादरम्यान थांबणार आहे. याचदरम्यान दक्षिण अरबी समुद्रात आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत ’यलो अलर्ट’ जारी केला आहे.

राज्यातील विविध शहरांत गुरुवारी नोंदवलेले किमान तापमान

पुणे-10.9 लोहगाव-13.9 नगर-13.2 जळगाव-11.5 कोल्हापूर-18.4 महबळेश्‍वर-13.9 नाशिक-12.2 सांगली-17.1
सातारा-15.4 सोलापूर-15.5 मुंबई-22.5 अलिबाग-19.4 रत्नागिरी-20.8 डहाणू-18.5
उस्मानाबाद-22.5 औरंगाबाद-13.6 परभणी-14 नांदेड-16.2
बीड-13.1 अकोला-14.4 अमरावती-14.4 बुलडाणा-15.2 ब्रह्मपुरी-15.9 चंद्रपूर-17.4 गोंदिया- 12.4 नागपूर-14.5 वाशिम-13.7 वर्धा-13.7 यवतमाळ-12.5

Exit mobile version