Legislative Council : मुंबईत काँग्रेसची कसोटी, भाजपला संधी | पुढारी

Legislative Council : मुंबईत काँग्रेसची कसोटी, भाजपला संधी

मुंबई ; दिलीप सपाटे : विधान परिषदेच्या (Legislative Council) स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघाच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधातील ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाराजी असल्याने मुंबईत शिवसेना नेते रामदास कदम यांचा पत्ता कट होणार असून त्यांच्याऐवजी युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई किंवा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची नावे आघाडीवर आहेत. भाजपला एक जागा जिंकण्याची संधी असल्याने काँग्रेसची कसोटी लागणार आहे.

रामदास कदम व भाई जगताप (मुंबई), सतेज उर्फ बंटी पाटील (कोल्हापूर), अमरीश पटेल (धुळे – नंदूरबार), गोपीकिसन बाजोरिया (अकोला – बुलडाणा – वाशिम) आणि गिरीश व्यास (नागपूर मतदारसंघ) यांची 1 जानेवारीला मुदत समाप्त होत असल्याने 10 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

महाविकास आघाडीच्या चार तर भाजपच्या दोन जागा रिक्त होत आहेत. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ही निवडणूक होत असल्याने महाविकास आघाडी व भाजपची ताकद पणाला लागणार आहे. (Legislative Council)

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सतेज पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी भाजप उमेदवाराच्या शोधात आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यावर अद्यापी अंतिम निर्णय झालेला नाही. धुळे – नंदूरबारमधून भाजपकडून विद्यमान आमदार अमरीश पटेल यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीला तुल्यबळ उमेदवार द्यावा लागणार आहे.

अकोला – बुलढाणा – वाशिम मतदार संघातून विद्यमान आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनाच शिवसेना संधी देऊ शकते. गेल्या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादीची मते फोडून त्यांनी विजय मिळविला होता. यावेळी महाविकास आघाडी एकत्र लढली तर त्यांना विजयाची संधी आहे. तर नागपूरमध्ये प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप पुन्हा आमदार गिरीष व्यास यांना की नव्या चेहर्‍याला संधी देतो याबाबत उत्सुकता आहे.

पोटनिवडणुकीत भाजपकडून केनेकर (Legislative Council)

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांना उमेदवारी देण्याची शिफारस प्रदेश भाजपने पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव निश्‍चित केले आहे.

* मुंबईत गेल्या निवडणुकीत शिवसेना नेते रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले होते तर तिसरे उमेदवार म्हणून भाजपाच्या पाठिंब्याने प्रसाद लाड निवडणूक रिंगणात उतरले होते. लाड यांनी मते फोडली असली तरी रामदास कदम आणि भाई जगताप सहज विजयी झाले होते; मात्र गेल्या निवडणुकीवेळी भाजपच्या फक्त 31 जागा होत्या. तर काँग्रेसकडे 52जागांचे संख्याबळ होते. 2017 च्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत 82 जागा जिंकल्या. काँग्रेसची 31 जागांवर घसरण झाली. त्यामुळे यावेळी भाजपला जिंकण्याची संधी असून काँग्रेसला निवडणूक सोपी राहिलेली नाही.

* शिवसेनेकडून रामदास कदम यांचा पत्ता कट होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवसेना कोणाला संधी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पाहता तरुणांना ताकद देण्यासाठी युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांचा नंबर लागण्याची अधिक शक्यता आहे. त्यांनी राज्यभर युवासेनेचे मेळावे घेऊन युवासेना बांधणीवर भर दिला आहे.

त्यांच्या नेतृत्वात युवासेनेने नारायण राणे यांच्या घरावर मोर्चा काढत त्यांना आव्हान दिले होते. मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. भाजप मात्र मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या उत्तर भारतीय नेत्याला संधी देऊन आपली व्होट बँक अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

एक जागा काँग्रेस गमावणार

मुंबई महानगरपालिकेमध्ये अवघे 29 नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विधान परिषदेची एक जागा गमवावी लागणार आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी यांनी पाठिंबा दिला तरी, काँग्रेसला आपला उमेदवार निवडून आणणे शक्य नाही. त्यामुळे काँग्रेस मुंबई महापालिकेतील जागेसाठी आपला उमेदवार उभा करणार का, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक दोन आमदारांना विधान परिषदेवर पाठवणार आहेत. मुंबई महानगरपालिकेतून 2016 मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेलेल्या आमदारांमध्ये शिवसेनेचे रामदास कदम व काँग्रेसचे भाई जगताप यांचा समावेश आहे. 2016 मध्ये भाजपने प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपकडे अवघे 28 नगरसेवक असल्यामुळे लाड यांना पराभवाचा सामना करावा लागला.

त्या अगोदरच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप युती असल्यामुळे भाजपाचे मधु चव्हाण शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे विजयी झाले होते. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे 97 भाजप 79, काँग्रेस 29, राष्ट्रवादी काँग्रेस 7 समाजवादी पार्टी 6, मनसे 1, एमआयएम 2 नगरसेवक आहेत.

शिवसेना व भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे त्यांच्या उमेदवारांना निवडून येणे अवघड नाही. काँग्रेसने उमेदवार उतरवायचा निर्णय घेतला तर, त्यांना राष्ट्रवादी 7 सपा 6 व एमआयएम 2 अशा 15 नगरसेवकांचा पाठिंबा मिळू शकतो. काँग्रेसला शिवसेनेनेही पाठिंबा दिला तर, अजून 17 ते 18 मते वाढू शकतात. तरीही काँग्रेस नगरसेवकांचे संख्याबळ 60 च्या वर पोहचू शकत नाही. त्यामुळे निवडणुकीतून माघार घेणे हाच काँग्रेससमोर सध्यातरी पर्याय आहे. पण भाजपचे नगरसेवक फोडण्यात महाविकास आघाडीला यश आले, तरच मुंबई महापालिकेत चमत्कार घडू शकतो.

Back to top button