Raut Vs BJP : तरीही शिवसेना सर्वांना पुरून उरली आहे : संजय राऊत | पुढारी

Raut Vs BJP : तरीही शिवसेना सर्वांना पुरून उरली आहे : संजय राऊत

मुंबई; पुढारी ऑनलाईन : दादरा-नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा खासदार निवडून आल्यानंतर शिवसेनेने जल्लोष केला. पण, त्यावर भाजपने खोचक प्रतिक्रिया दिली होती. भाजपने म्हंटलं होतं की, “महाराष्ट्राच्या बाहेर एक खासदार काय निवडून आला. शिवसेनेच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडू लागली आहेत.” त्यावर संजय राऊत (Raut Vs BJP) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, “भाजपचा आज संपूर्ण देशात ठिकठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत पराभव झाला आहे. शिवसेनेचा खासदार आज दादरा नगर हवेतील निवडून आला याचा नक्कीच आनंद आहे. पण भाजपाला इतकं महत्त्वाचं वाटत नसेल मग केंद्रीय मंत्र्यांची फौज प्रचारात का उतरवली होती? रेल्वेमंत्री ६ दिवस तळ ठोकून होते. स्मृती इराणी होत्या आणि गुजरात सरकारचे मंत्रीही होते. तरीही शिवसेना सर्वांना पुरून उरली आहे. पंतप्रधानपदाच्या स्वप्नाची भाषा करणाऱ्यांनी शिवलेले कोट २०२४ साली भांडीवाल्याला देण्यासाठी तयार राहावं”, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

इंधन दर कपातीवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला (Raut Vs BJP) चिमटे काढलेले आहेत. “राज्य सरकार दर वाढवत नाही. राज्य सरकार या महागाईविरोधात आहे. पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी करून काय होणार? किमान २५ रुपयांनी कमी करायला हवे होते. १०० रुपये वाढवायचे आणि त्यातील ५ रुपये कमी ही खेळी आहे. पेट्रोलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर देशभरात भाजपचा पराभव करावा लागेल. महागाईला केंद्र सरकारच जबाबदार आहे. इंधन दरवाढीतून कोट्यवधी रुपये कमविले”, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्रावर केली.

संजय राऊत म्हणाले, “केंद्र सरकारचे मन मोठं नाही तर सडकं आहे. गेल्या महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून केंद्रानं बेहिशोबी मालमत्ता कमवली.” पेट्रोल दरामध्ये तुटपुंजी कपात केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोदी सरकारवर टीका केली जात आहे. काॅंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनीही ट्विट करून मोदी सरकारच्या इंधन दरकपातीवरून टीका केली आहे.

पहा व्हिडिओ : काय आहे लक्ष्मीपूजनाचे महत्त्व?

Back to top button