मुंबई : पुढारी वृत्तसेवा 2003 मध्ये उघडकीस आलेला अब्दुल करीम तेलगीचा तब्बल 30 हजार कोटींचा घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या राजकारणात पुन्हा चर्चेत आला आहे. या स्टॅम्पपेपर घोटाळ्यात मंत्री छगन भुजबळ यांचेही नाव होते; मग त्यांना वाचवले कुणी? असा सूचक सवाल करीत जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांविरोधात नवी आघाडी उघडली. रविवारी बीडमध्ये झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत भुजबळ यांनीच तेलगीच्या स्टॅम्प घोटाळ्याचा विषय छेडला.
थेट शरद पवारांवर तिरंदाजी करत भुजबळ म्हणाले, तेलगीला अटक करून त्याच्यावर 'मोका' लावण्याचे आदेश मी तेव्हा दिले होते. त्यावेळी शरद पवारांनी मला बोलावले आणि राजीनामा देण्यास सांगितले. 1992, 1993 आणि 1994 साली शरद पवारांवरही आरोप झाले होते; पण शरद पवारांचा राजीनामा कुणी मागितला नाही. मग, माझाच राजीनामा का घेतला, असा सवाल भुजबळ यांनी पवारांना या सभेतून विचारला.
आव्हाड यांनी ट्विट करत तेलगी घोटाळ्यात शरद पवारांनी भुजबळांना कसे वाचवले, याकडे सूचकपणे लक्ष वेधले. आव्हाड ट्विटमध्ये म्हणतात, तेलगी प्रकरणाचा तपास सीबीआयने केला. आरोपपत्रही तयार केले आणि ते आरोपपत्र तपासणीसाठी तत्कालीन महाधिवक्ता अमरेंद्र शरण यांच्याकडे पाठवले. त्यांच्या दुसर्या दिवशी सकाळी मला फोन आला व मला दिल्लीला बोलावून घेतले. दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकरण समजावून सांगितले. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, याबाबत तुम्ही शरद पवारांशी चर्चा करा. शरद पवार आणि त्यांच्यात चर्चा झाली.
आव्हाड त्याच ट्विटमध्ये म्हणतात, नंतर दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल झाले. त्यानंतर मूळ आरोपपत्रात जी नावे होती ती वगळण्यात आली होती. यामधून आपल्याला जो अर्थ काढायचा आहे तो काढून घ्या. एक अद़ृश्य हात सगळी नावे खोडून गेला. तो अद़ृश्य होता कुणाचा? समजनेवाले को इशारा काफी होता है!