मुंबई : अखंड 85 वर्षांची परंपरा लाभलेल्या 'पुढारी' वृत्तसमूहाच्या 'पुढारी न्यूज' टी.व्ही. चॅनलचे मंगळवार, दि. 29 ऑगस्ट रोजी लाँचिंग (ऑन एअर) होत आहे. या निमित्ताने पुढारी वृत्तसमूह इलेक्ट्रॉनिक मीडियात दिमाखात पदार्पण करीत आहे. प्रिंट मीडिया, एफ.एम. रेडिओ (ब्रॉडकास्टिंग मीडिया) आणि डिजिटल प्लॅटफॉर्मपाठोपाठ 'पुढारी न्यूज' टी.व्ही. चॅनलचे हे नवे पाऊल आहे.
मीडियाच्या सर्व क्षेत्रांत असणारा 'पुढारी' हा एकमेव मराठी वृत्तसमूह आहे. नवी मुंबईतील वाशी येथील 'पुढारी'च्या भव्य इमारतीत कोणत्याही वृत्तवाहिनीपेक्षा पूर्णपणे अधिक अत्याधुनिक आणि भव्य असा स्टुडिओ उभारण्यात आला आहे. या स्टुडिओत हे लाँचिंग करण्यात येणार आहे.
निःपक्ष, निर्भीड, सडेतोड आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आक्रमक पत्रकारितेचा वस्तुपाठ 'पुढारी'ने घालून दिला आहे आणि प्रारंभापासूनच जनतेची अतूट नाळ जुळलेली आहे. हीच परंपरा आणि जनतेचा द़ृढ विश्वास जीवाभावाने जपण्याचे कंकण बांधत 'पुढारी न्यूज' टी.व्ही. चॅनल लोकसेवेत रुजू होत आहे. नवी दिल्लीसह संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह देशातील प्रमुख ठिकाणी या नूतन चॅनलचे विस्तृत नेटवर्क असून त्याबरोबरच परदेशातील प्रमुख महानगरांतही चॅनलचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. परदेशात अशा प्रकारे प्रतिनिधी असलेले हे एकमेव मराठी टी.व्ही. चॅनल आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सार्या जगातील ताजे वृत्तांत छायाचित्रे-व्हिडीओंसह उपलब्ध होणार आहेत. हे चॅनल संपूर्ण जगातील सर्व देशांत पाहता येणार आहे.
राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षणासह विविध क्षेत्रातील घडामोडींबरोबरच Exclusive वृत्तांत हेही चॅनलचे वैशिष्ट्य राहणार आहे. राजकीय, सामाजिक घडामोडींवर अचूक आणि सखोल भाष्य करण्याबरोबरच कोणाचाही मुलाहिजा न बाळगता 'जनतेचा आवाज' अशी 'पुढारी न्यूज' टी.व्ही. चॅनलची ओळख प्रकर्षाने दिसून येणार आहे. 'लोकांचे चॅनल' ही उज्ज्वल प्रतिमा घेऊन मंगळवार, दि. 29 पासून 'पुढारी न्यूज' टी.व्ही. चॅनलचा प्रारंभ होत आहे.
पन्नास वर्षांहून अधिक काळ वृत्तपत्रसृष्टीत अखंडपणे संपादकीय कारकीर्द गाजवणारे आणि पत्रकारितेतून समाजकारणही करता येते, याचा आदर्श घालून देणारे 'पुढारी'चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि 'पुढारी' समूहाचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वाखाली या नूतन चॅनलचा झंझावात सुरू होत आहे. 'पुढारी'चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी लावलेला 'पुढारी'चा वेलू डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी गगनावरी नेला. सर्वदूर रुजलेल्या समूहात 'पुढारी न्यूज' टी.व्ही. चॅनलने आता कळस चढविला आहे.
या नंबरवर पहा 'पुढारी न्यूज' चॅनल
मंगळवारपासून लाँच होत असलेले पुढारी न्यूज चॅनल टाटा प्लेच्या 1267, एअरटेलच्या 541, हॅथवेच्या 531, जीटीपीएलच्या 466, युसीएनच्या 277 तर 'डेन' 821 क्रमांकावर पाहता येणार आहे.