मुंबई
पॉलिटेक्निक नापास विद्यार्थ्यांना पुन्हा मिळणार संधी : मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई: राज्यातील तंत्रनिकेतन पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३- २४ मध्ये पुढील सत्र किंवा वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्यासाठी एक वेळ संधी देण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील ५८ हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत विद्यार्थी हितास्तव एक विशेष बाब म्हणून तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुढील सत्र /वर्षाचे सत्रकर्म पूर्ण करण्यासाठी एक वेळ संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.