कोरोना तिसर्‍या लाटेसाठी मुंबईचे ‘जम्बो’ नियोजन | पुढारी

कोरोना तिसर्‍या लाटेसाठी मुंबईचे ‘जम्बो’ नियोजन

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना ची तिसरी लाट आलीच तर तिचा सामना कसा करायचा याचे नेमके नियोजन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. या नियोजनात जम्बो हॉस्पिटल्स मोठी भूमिका बजावू शकतात, तर इतर सर्व रुग्णालयांची क्षमता संपलीच तर वैद्यकीय महाविद्यालयांचे रुपांतर रुग्णालयांमध्ये केले जाऊ शकते.

कोरोना च्या दुसर्‍या लाटेपासून धडा घेत ज्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण नाहीत ती रुग्णालये तशीच कार्यरत ठेवायची. त्यांना पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये सायन रुग्णालय, केईएम, नायर आणि कूपर यांचा समावेश आहे.

गोरेगाव येथील नेस्को आणि भायखळ्याचे रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रूडास तसेच मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालय या ठिकाणी सुरुवातीचे रुग्ण दाखल करायचे नियोजन आहे.

या कोविड केंद्रात 50 टक्के क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण झाल्यास मुलुंड आणि बीकेसी येथील जम्बो कोविड केंद्र सुरू करण्यात येतील. रुग्ण गंभीर अवस्थेत असतील तर दहिसर येथील जम्बो कोविड केंद्र सुरू करण्यात येईल. याठिकाणी अतिदक्षता विभागातील 100 बेड्स आहेत. दुसर्‍या लाटेमध्ये मुंबईतील जम्बो केंद्रांवरच भार टाकण्यात आला होता.

कोरोना तिसर्‍या लाटेसंदर्भातील नियोजना संदर्भात बोलताना महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, या दुसर्‍या लाटेमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आलेला रुग्णांचा भार जम्बो कोविड केंद्रांमध्ये रुग्णांना भरती करून हलका करण्यात आला होता. जेणेकरून या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इतर आजार आणि व्याधींवरील रुग्णांवर उपचार करणे शक्य व्हावे. तिसर्‍या लाटेवेळी अशी स्थिती आली तर एचएन रिलायन्स रुग्णालयातर्फे चालवले जाणारे वरळी येथील एनएससीआय जम्बो कोविड केंद्र ताब्यात घेऊन तेथे उपचार सुरू केले जातील.

पहिल्या लाटेनंतर दहिसर, मुलुंड आणि बीकेसी येथील जम्बो कोविड केंद्रे दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली होती. ती मे महिन्याच्या मध्याला अद्ययावत करण्यात आली. गोरेगाव येथील नेस्को केंद्रात सीटी स्कॅन सुविधा सुरू करण्यात आली. तर पॅथॉलॉजीची सुविधा 24 तास सुरू झाली. दहिसर केंद्रात 40 बेड्स सर्व प्रकारच्या सुविधांनी युक्‍त करण्यात आले.

सध्या मुंबईतील जम्बो रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मिळून 12000 बेड्स आहेत. ते वाढवून 19900 पर्यंत नेले जातील. त्याचबरोबर मालाड, कांजूरमार्ग आणि सोमय्या मैदानातील केंद्रांमध्ये आणखी 8300 बेड्स वाढवण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

 

Back to top button