मुंबई, वृत्तसंस्था : आज लोकसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात भाजप आणि महाविकास आघाडीत अवघा एक टक्क्याचा फरक असल्याचे टाईम्स नाऊ नवभारतच्या ताज्या सर्वेक्षणात समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार, लोकसभेत भाजपला 43.10 टक्के, तर महाविकास आघाडीला 42.10 टक्के लोकांनी पसंती दिल्याचे समोर आले आहे; तर इतरांना 14.80 टक्के जणांनी पसंती दिली आहे.
देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत सर्व राजकीय पक्ष गुंतले असताना, आज निवडणुका झाल्या तर जनमानस काय असेल? याचा कानोसा घेण्यासाठी टाईम्स नाऊ- नवभारतच्या वतीने एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात देशात 285 ते 325 जागा भाजप व मित्रपक्षांना मिळू शकतात, तर काँग्रेस व मित्रपक्ष 111 ते 149 जागा पटकावू शकतात, असे समोर आले होते.
याच निष्कर्षात महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीबाबत जनमानसाचा कानोसा घेण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली तर भाजपच्या पारड्यात जरा जास्त मताधिक्य पडेल. सर्वेक्षणात भाजपला 43.10 टक्के, तर महाविकास आघाडीला 42.10 टक्के मते मिळाली आहेत. इतरांची मतांची टक्केवारी 14.80 टक्के आहे. महाविकास आघाडीच्या मतांच्या तुलनेत महाराष्ट्रात भाजपचे मताधिक्य पुढे असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले असले, तरी संख्याबळ पाहता महाविकास आघाडी भाजपच्या तुलनेत फारशी मागे नाही.