एमएचटी सीईटी मध्ये मुलींची बाजी | पुढारी

एमएचटी सीईटी मध्ये मुलींची बाजी

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी च्या निकालात मुलींनी बाजी मारली असून पीसीएममध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) 100 टक्के पर्सेन्टाईल गुण 11 विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. तर पीसीबीमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) मध्ये तब्बल 17 विद्यार्थ्यांनी 100 टक्के पर्सेन्टाईल गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणार्‍या एमएचटी सीईटी चा निकाल बुधवारी सायंकाळी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आला. राज्यातून या परीक्षेला दोन्ही गट मिळून 5 लाख 4 हजार 835 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्षात 4 लाख 14 हजार 968 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 89 हजार 867 विद्यार्थी परीक्षेला बसलेच नाहीत.

पीसीएम हे विषय घेऊन सुमारे 1 लाख 92 हजार 36 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पीसीबी हा गट घेऊन 2 लाख 22 हजार 932 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी पीसीएम गटातील 11 विद्यार्थ्यांनी तर पीसीबी गटातील 17 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. दोन्ही गटात 28 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. यात 13 मुले तर 15 मुली आहेत.

असे आहेत गुणवंत विद्यार्थी

पीसीएम गटात मुंबईतील विंच्ची दिशी, हर्ष शाह, अर्श मकनोजिया, नीरजा पाटील, राकेश कृष्णा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर ठाण्यातील जनम खंडेलवाल या विद्यार्थ्याचा समावेश आहे. ‘पीसीबी’ गटात मुंबईतील राजवील लखानी, कल्याणी कुडाळकर, कृष्णप्रिया नम्बोथिरी ठाण्यातील मयुरा निकिता, गायत्री नायर यांना 100 पर्सेंटाइल मिळाले.

Back to top button