भारत सीरिजची पहिली मोटार मुंबईत | पुढारी

भारत सीरिजची पहिली मोटार मुंबईत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भारत सरकारने आंतरराज्य प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सोयीकरिता बीएच (भारत) ही नवी मालिका (सीरिज) वाहन नोंदणीसाठी सुरू केली आहे. यानुसार राज्यात वाहन नोंदणी सुरू झाली आहे. यामुळे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती परिवहन, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

बीएच मालिकेंतर्गत ज्या राज्यात वाहनांची प्रथम नोंदणी होईल, त्या ठिकाणी दोन वर्षांचा कर भरावा लागेल. दोन वर्षांच्या आत अन्य राज्यात वाहन गेल्यास हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षासाठी संबंधित राज्यात कर भरावा लागणार आहे. त्यामुळे वाहन ट्रान्सफर करणे, परतावा मिळण्यासाठी अर्ज करणे, परतावा मिळण्यापर्यंत वाट पाहणे, त्यानंतर संबंधित राज्यात नोंदणी करणे या सर्व प्रक्रियेपासून वाहन मालकाची सुटका होणार आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली बीएच मालिका ही फायदेशीर ठरणार आहे, असे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

किचकट प्रक्रिया सोपी

वाहन नंबर प्लेटवरील बीएच मालिकेमुळे वाहनमालकांना एका राज्यातून दुसर्‍या राज्यात सहज जाता येईल. पूर्वी हा प्रवास करताना नोंदणी प्रक्रिया करावी लागते. बीएच मालिकेमुळे हा त्रास वाचेल, शिवाय ही नोंदणी पद्धत डिजिटल असल्याने वाहनधारकांना याचा फायदा होईल. मोटार वाहन कायदा 1988 नुसार एका राज्यात नोंदणी केलेली गाडी दुसर्‍या राज्यात बारा महिन्यांपेक्षा अधिक काळ ठेवल्यास नव्याने नोंदणी करावी लागत होती. परंतु, बीएच मालिकेमुळे ही किचकट प्रक्रिया आता रद्द झाली आहे.

महाराष्ट्रात नोंदणी देशातली पहिली गाडी

भारत सिरीज नुसार देशातील पहिले वाहन महाराष्ट्रात महाराष्ट्रात आणि मुंबई नोंदविण्यात आले आहे आरसीएफ मध्ये काम करणाऱ्या श्रद्धा सुटे यांनी ही नोंदणी केली आहे. परिवहन राज्यमंत्री यांच्या मदतीने आठ दिवसात ही सर्व प्रक्रिया पार पाडता आली याचा आनंद सुटे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता देशात कुठेही गाडी घेऊन फिरणे सोपे झाले आहे. त्यामुळे हा उपक्रम अतिशय चांगला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या पहिल्या नोंदणीचे अनावरण केले.

Back to top button