
मुंबई : नरेश कदम : राज्यातील सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाच्या ठिणग्या उडत असताना आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या कल्याण, पालघर, मुंबई उत्तर पश्चिम, नाशिक, रामटेक या जागांवर भाजप आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद या जागांवरही भाजपचा डोळा आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे १५ खासदार मूळ शिवसेनेतून आले आहेत. या सर्व खासदारांना आपल्याला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळेल, असे आश्वासन भाजपच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु भाजपने अलीकडे लोकसभा निवडणुकीबाबत खासगी सर्व्हे केला असून त्यात काही जागी शिवसेनेच्या विद्यमान खासदारांचा पराभव होऊ शकतो, असे अहवाल आहेत.
कल्याणचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे असून या जागेवर भाजपच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी दावा केला आहे. २५ वर्षापूर्वी ही जागा भाजप लढवत असे. तेथे भाजपचे नेटवर्क आहे, त्यामुळे भाजपचा या जागेवर दावा आहे. परंतु थेट मुख्यमंत्री शिंदे हे यात मध्यस्थी करून ही जागा आपल्या गटाकडे राखतील. मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे हे उध्दव ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपचा की शिंदे गटाचा उमेदवार असणार हे सध्या गुलदस्त्यात आहे. मुंबई उत्तर पश्चिम ही जागा आता शिंदे गटाकडे असली तरी तेथे भाजपने निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.
दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपचे जास्त आमदार आहेत. त्यामुळे त्या जागेवर भाजपच्या नेत्यांनी दावा केला आहे. पालघरमध्ये शिंदे गटाचे खासदार आहेत. पूर्वी पालघरमध्ये भाजपचे खासदार होते. त्यामुळे ही जागा भाजप घेणार आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जागा भाजप लढविण्याच्या तयारीत आहे. तेथे शिंदे गटाचे आमदार जास्त असले तरी या तीन जागा भाजप लढवेल, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये नव्याने वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने भाजप आपली कोकणातील ताकद आजमावून पाहू शकेल.
उस्मानाबाद येथे आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत परंतु भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांनी या जागेवर दावा केला आहे. तर शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनीही ही जागा आम्ही लढवू असे म्हटले आहे. त्यामुळे या जागेवर वाद आहे. रामटेकच्या जागेवर शिंदे गटाचे खासदार आहेत. मात्र येथे भाजपचे मोठे नेटवर्क आहे त्यामुळे भाजपने येथे दावा केला आहे.