Raut Vs NCB : बाॅलिवुडकरांनी मुंबई सोडून जाण्यासाठीच हे षडयंत्र - पुढारी

Raut Vs NCB : बाॅलिवुडकरांनी मुंबई सोडून जाण्यासाठीच हे षडयंत्र

मुंबई, पुढारी ऑनलाईन : बाॅलिवुड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरण आता वेगळं वळण घेत आहे. पंच प्रभाकर साईलने या प्रकरणात केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Raut Vs NCB) म्हणाले की, “मुंबईत सिनेसृष्टी आहे. हे मुंबईचं वैभव आहे. बॉलीवूड कलाकारांनी मुंबई सोडून जावं म्हणूनच सिनेसृष्टीला बदनाम केलं जात आहे.”

संजय राऊत हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना एनसीबी जोरदार (Raut Vs NCB) हल्ला चढवला. ते म्हणाले की, “मुंबईत सिनेसृष्टी आहे आणि ती मुंबईचं वैभव आहे. ही सिनेसृष्टी बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. एनसीबीच्या माध्यमातून हे षडयंत्र रचलं गेलं आहे. जेणेकरुन मुंबईतून या लोकांनी निघून जावं अशाप्रकारच्या षडयंत्रातून बॉलीवूडकलाकारांना लक्ष्य केलं जात आहे”, अशीही टीका त्यांनी केली.

“सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर एनसीबी नावाचा प्रकार आहे हे दिसून आलं. मुंबई महाराष्ट्रात एनसीबी फारच कामाला लागली आहे. जणू काही मुंबई-महाराष्ट्रात अफगाणिस्तान, पाकिस्तानप्रमाणे गच्चीवर, घराघरात आणि बाल्कनीत चरस-गांजाचं पिक काढलं जातं. महाराष्ट्राचे लोक अफू-गांजाचा व्यापर करतात अशी एक बदनामी देशात केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणात स्यूमोटो घेऊन कारवाई केली पाहिजे. तसंच याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली गेली पाहिजे”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या गंभीर आरोप केलेले होते. आर्यन खानच्या विरोधातील प्रकरणात पंच झालेल्या प्रभाकर साईलने समीर वानखेडे आणि  के. पी. गोसावी यांच्यावर धक्कादायक आरोप केलेले आहेत. आरोप करणारा प्रभाकर साईल हा गोसावीचा बाॅडीगार्ड आहे.

प्रभाकरने आरोप करताना सांगितले की, “के. पी. गोसावी आणि सॅम यांच्यातील २५ करोड रुपयांसंदर्भातील संवाद ऐकला होता. त्यात २५ करोडवरून १८ करोडवर डील फिक्स झालेली आहे, असंही त्यांने ऐकले होते. इतकंच नाही तर गोसावी आणि सॅम यांच्यातील संवादात ८ करोड रुपये एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना द्यायचे आहेत, असंही प्रभाकर साईलने ऐकले होते.

प्रभाकरने असंही सांगितलं आहे की, “क्रूझवर छापेमारी केल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीबरोबर के. पी. गोसावी आणि सॅम यांची निळ्या रंगाच्या मर्सिडिस कारमध्ये जवळजवळ १५ मिनिटं संवाद झालेला मी पाहिलेला आहे. यानंतर गोसावीने मला फोन केला आमि पंच होण्यासाठी सांगितले. एनसीबीन माझ्याकडून १० कोऱ्या कागदांवर सह्या करून घेतल्या. इतकंच नाही तर ५०-५० लाखांची कॅश असलेल्या दोन बॅग्ज गोसावीला देण्यात आल्या, “असंही प्रभाकर साईलेने सांगितलं आहे.

पहा व्हिडीओ : अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्यांना रामदास कदमांनी दिली ?

Back to top button