पुणे / मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मान्सूनच्या पावसाचे आगमन यंदा अपेक्षेपेक्षा काही दिवसांनी लांबले असून बुधवारपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो, असे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मान्सूनसाठी अरबी समुद्रात अनुकूल हवामान असले तरी त्याच्या आगमनाचा याआधीचा अंदाज चुकला आहे.
केरळच्या किनारपट्टीवर 4 जून रोजी मान्सून धडकू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी वर्तविला होता. गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर 2020 साली 1 जून रोजी, 2021 साली 3 जून रोजी तर 2022 साली 29 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, तसेच काळे ढग जमा झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मान्सून वेगाने केरळच्या किनारपट्टीवर येऊ शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
वेगवान वार्यामुळे व्यत्यय
दक्षिण अरबी समुद्रात 2.1 किलोमीटर उंचीपर्यंत वेगवान वारे वाहत असल्याने मान्सूनचे आगमन लांबले आहे. केरळमध्ये मान्सून उशिराने पोहोचणार असल्याने देशाच्या उर्वरित भागातही त्याचे आगमन लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत स्थिती पुरेशी स्पष्ट होईल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
अरबी समुद्रातील दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचे चक्रीवादळात परिवर्तन झाल्यास मान्सूनला गती मिळण्याची शक्यता आहे, हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली.