आर्यन खान याच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी - पुढारी

आर्यन खान याच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. येत्या मंगळवारी त्यावर सुनावणी होणार आहे. दुसरीकडे गुरुवारी एनसीबीने बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिची कसून चौकशी केली.

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यनने जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र मंगळवारी सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघाही आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.

या अर्जावर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली.त्यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत यासाठी मंगळवारचा दिवस निश्‍चित केला. सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने आर्यन खान सह अन्य 20 आरोपींची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबर पर्यंत वाढवली.

आर्यन आजही तुरूंगात का?

क्रूझ ड्रग्स प्रकरणात अडकलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची जामीन याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली असल्याने त्याच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. हा जामीन अर्ज फेटाळताना मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी 18 पानांच्या आदेशात असे म्हटले आहे की, प्रथमदर्शनी असे दिसते की आर्यन खानविरोधात पुरावे आहेत.

याच कारणांमुळे आर्यनला जामीन नाही

1 आर्यन आणि अरबाज बर्‍याच काळापासून मित्र आहेत. ते एकत्र जात होते आणि क्रूझवर एकत्र पकडले गेले. दोघांनीही त्यांच्या जबाबात ड्रग्स घेतल्याची कबुली दिली आहे. हे सर्व दर्शवते की, आर्यनला माहित होते की अरबाजच्या शूजमध्ये ड्रग्स आहेत.

2 आर्यनच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्याच्याकडे ड्रग्स सापडले नाहीत, त्यामुळे तो नशेमध्ये नव्हता. यावर न्यायालयाने म्हटले की, आरोपी क्रमांक -1 (आर्यन खान) कडून कोणताही प्रतिबंधित पदार्थ सापडला नसला तरी आरोपी क्रमांक -2 कडे (अरबाज मर्चंट) 6 ग्रॅम चरस सापडला आहे. म्हणून असे म्हणता येईल की, दोघांनाही याबद्दल माहिती होती.

3 न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील म्हणाले, व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून असे दिसून येते की, आरोपी क्रमांक -1 अज्ञात व्यक्तींशी ड्रग्जबद्दल बोलत होता. म्हणून, प्रथमदर्शनी असे दिसते की अर्जदार आणि आरोपी क्रमांक-1 ने अज्ञात व्यक्तींसोबत बंदी असलेल्या अंमली पदार्थांची डील करत होता.

4 यव्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून असे दिसून येते की आरोपी क्रमांक -1 आणि ड्रग पेडलर्समध्ये संबंध होते. त्याने आरोपी क्रमांक -2 सोबत चॅटिंग केली आहे. या व्यतिरिक्त, आरोपी क्रमांक 1 ते 8 यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यासोबत काही प्रमाणात बंदी घातलेले पदार्थ सापडले आहेत.

5 हे प्रकरण रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीसारखे आहे. शोविकच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून तो ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात असल्याचेही उघड झाले होते. न्यायाधीश पाटील म्हणाले, प्रथमदर्शनी असे दिसते की, आरोपी एका मोठ्या नेटवर्कचा भाग आहे. जसे शोविक चक्रवर्तीच्या बाबतीत होतं. आरोपी हा षडयंत्राचा भाग असल्याने, जे काही ड्रग्ज जप्त केले गेले आहेत त्याला तो जबाबदार आहे. प्रत्येक आरोपीचे प्रकरण एकमेकांपासून वेगळे करता येत नाही.

चॅटमुळे अडकली अनन्या

आर्यन खान याच्यासोबत अनन्या हिचे ड्रग्ज चॅट एनसीबीला मिळाले आहेत. त्यानुसार एनसीबीने गुरुवारी समन्स बजावल्यानंतर दोन तासांच ती चौकशीला हजरदेखील झाली. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी तिची चौकशी केली.

एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापे टाकले तेव्हा तिथे अनन्या सुद्धा क्रूझवर उपस्थित होती आणि एनसीबीने तिला जाऊ दिले होते, असेही म्हटले जात असले तरी त्यास दुजोरा मिळालेला नाही. अनन्याच्या चॅटची छाननी केल्यानंतर एनसीबीचे पथक अनन्याच्या घरी पोहोचले. सुमारे अर्धा तास ते बंगल्यात होते.

अनन्याच्या घरावर छापा टाकण्यात आलेला नाही. पथक केवळ समन्स बजावण्यासाठी गेले होते. शाहरुखचा बंगला मन्‍नतचीही झाडाझडती घेतलेली नाही. आर्यन खानची आतापर्यंतची वैद्यकीय कागदपत्रे, त्याच्या विदेश प्रवासाचा तपशील असलेली कागदपत्रे घेण्यासाठी एनसीबीचे पथक मन्‍नतवर गेले होते, असे गुरुवारी एनसीबीकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले.

Back to top button