दुकाने आजपासून रात्री ११, रेस्टॉरंट्स १२ पर्यंत सुरू राहणार | पुढारी

दुकाने आजपासून रात्री ११, रेस्टॉरंट्स १२ पर्यंत सुरू राहणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीचा अंधार फिटावा आणि आकाश मोकळे व्हावे तसे व्यवहार सुरू होत असल्याने या दिवाळी गिफ्टने सर्वत्र लक्ष्मीपूजनापूर्वीच लक्ष्मीचा संचार सुरू झाल्याचे दिसते. राज्यातील सर्व दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत, तर उपाहारगृहे मध्यरात्रीपर्यंत (रात्री 12) सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आणि त्यासाठीचा आदेशही मंगळवारी जारी केला. अर्थात स्थानिक कोरोना परिस्थितीनुसार दुकाने आणि उपाहारगृहांच्या वेळांत बदल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत.

कोरोनासाठी लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे नागरिकांना आणि आस्थापनांना काटेकोरपणे पालन करावे लागणार असल्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

सध्या सणासुदीचे दिवस असून दुकाने, रेस्टॉरंट्स, हॉटेल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात ठेवून हा वेळ वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कॉलेज, कृषी महाविद्यालये आजपासून सुरू

राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित शासकीय व खासगी विनाअनुदानीत विद्यालये व महाविद्यालयातील नियमित वर्ग बुधवार (ता. 20) पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 13 ऑक्टोबर 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयामधील नियमित वर्ग 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता बारावीपर्यंतचे वर्ग 4 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्यात आलेले आहेत. दिवाळीनंतर पहिली ते आठवी शाळाही सुरू करण्याची तयारी शिक्षणखात्याने केली आहे.

पुनश्च हरि ओम

* बहुतांश आस्थापना, सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालये सुरू.
* शाळा, कॉलेजेस उघडली. अकृषक, कृषी विद्यापीठेही सुरू होत आहेत.
* 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू होत आहेत.
* अ‍ॅम्युझमेंट पार्क सुरू होत आहेत.
* खासगी आणि सार्वजनिक वाहतूक जवळपास सुरळीत झाली आहे. पर्यटकांना
* दिवाळी सुट्ट्यांमध्ये भटकंती करता येईल.
* मॉल्स दोन डोसच्या अटीवर उघडले. आता दुकाने, हॉटेल्सही रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार

Back to top button