ठाण्यात तरुणीवर अडीच वर्षे अत्याचार - पुढारी

ठाण्यात तरुणीवर अडीच वर्षे अत्याचार

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असतानाच ठाण्यातील कासारवडवली भागात 26 वर्षीय तरुणीवर चौघा मित्रांनी दोन वर्षांहून अधिक काळ अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मंगळवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अत्याचार करणार्‍या चार जणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत.

ठाण्यातील एका बारमध्ये 26 वर्षीय तरुणी वेटरचे काम करते. तिथेच तिची ओळख गोविंद राजभर (32, रा. नालासोपारा) याच्याशी झाली. मैत्री झाल्यानंतर त्याने लग्नाच्या भूलथापा देऊन या तरुणीकडून घरखरेदीसाठी 7 लाख 55 हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेतले. नंतर तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवून चित्रीकरणही केले. हे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने घोडबंदर रोड येथील वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याने या तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण केली.

अत्याचारांचे प्रकार एवढ्यावरच थांबले नाहीत. पीडित तरुणीला धमकावून राजभर याच्या तीन साथीदारांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या तिघांनी काशीमीरा भागातील वसईकडे जाणार्‍या रस्त्यावर एका कारमध्ये पुन्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे अत्याचार 1 फेब्रुवारी 2019 ते 30 ऑगस्ट 2021 या कालावधीत झाल्याचे पीडित तरुणीने मंगळवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दोन पथके चौघांच्या मागावर

सामूहिक बलात्कार प्रकरणी गोविंद राजभर आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या या चार संशयित आरोपींंच्या शोधासाठी दोन पथके नेमल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली. महिला सहायक पोलीस निरीक्षक शीतल चौगुले अधिक तपास करीत आहेत.

Back to top button