सिंगल डोसवाल्यांनाही दिवाळीनंतर लोकल प्रवास : आरोग्यमंत्री राजेश टोपे | पुढारी

सिंगल डोसवाल्यांनाही दिवाळीनंतर लोकल प्रवास : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव व दसर्‍यानंतरही राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात राहिली आहे. दिवाळीनंतर हीच परिस्थिती कायम राहिल्यास लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही मॉल, रेल्वेसह अन्य ठिकाणी प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले.

सवलत देण्याबाबत टास्क फोर्स, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांचे आहे. त्यामुळे अशा लोकांची अडचण लक्षात घेऊन सरकार सवलत देण्याचा विचार करत आहे. रेल्वे प्रवास,मॉल्समध्ये प्रवेश करण्याबाबत अजूनही जे निर्बंध आहेत, त्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. सणासुदीचा काळ लक्षात घेता राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकेल, अशी भीती तज्ज्ञ आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व्यक्त करत होते. मात्र रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. आताच्या घडीला राज्यात फक्त 30 हजार सक्रिय रुग्ण आहेत.

बाधितांची संख्या आटोक्यात असल्याने राज्य सरकारने शाळा, मंदिरे, सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरू केली आहेत. येत्या बुधवारपासून राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये सुरू होत आहेत. राज्यात आजच्या घडीला साडेसहा कोटींहून अधिक (70 टक्के) नागरिकांना किमान पहिला तर 2.9 कोटी (32 टक्के) नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.

यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी आहे. त्यामुळे दिवाळीनंतर दहा दिवसांनी म्हणजेच 15 नोव्हेंबरनंतर राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही रेल्वे प्रवासास आणि मॉलमध्ये प्रवेश देण्याचा विचार होऊ शकतो, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

दिवाळी सुट्टीतही रुग्णसंख्या आटोक्यात

15 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील 80 टक्के नागरिकांना किमान पहिला डोस तर 40 टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळू शकतो. त्यामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार होईल. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीच्या काळात नागरिकांचे स्थलांतर झाले तरी रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता कमी राहील, असे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरनंतर एक डोस घेतलेल्या नागरिकांनासुद्धा रेल्वे प्रवास असो की मॉल्समध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Back to top button