मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा गुरुवारी निकाल लागणार आहे. या निकालापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्यात जुंपली आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोण घेणार, यावरून रंगलेल्या कलगीतुऱ्यात राऊतांनी नार्वेकरांच्या राजीनाम्याची मागणी करत आरोप केले. त्यावर, कायद्याचे अभ्यास कमी असल्यानेच राऊत असे विधान करत असल्याचे सांगत त्यांना फारसे गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही, असे उत्तर नार्वेकरांनी दिले आहे.
आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष म्हणून आपल्याकडेच येणार असल्याचे विधान राहुल नार्वेकरांनी केले होते. त्यावर माध्यमांशी बोलताना राऊतांनी टीकेची झोड उठवली. अलीकडेच राहुल नार्वेकर यांची केंद्रीय कायदा मंत्र्यासोबत बैठक झाली होती. कायदामंत्र्यांनी तीन तास बंद दरवाजाआडच्या बैठकीत न्यायालयात काय होणार हे सांगितले का, तुमच्याकडेच प्रकरण येईल हे तुम्हाला कसे माहीत, ही कोणती दादागिरी आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती राऊतांनी केली. अध्यक्ष स्वतःकडे अधिकार खेचून घेतात, असा आरोप करतानाच राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली.
त्यावर, संजय राऊत यांचा संविधानाचा अभ्यास कमी असल्यामुळे आणि संविधानातील तरतुदींचे वाचन न केल्यामुळे त्यांच्याकडून असे बेजबाबदार वक्तव्य केली जातात. त्यामुळे जनतेने त्यांना माफ करावे, असे मला वाटते. अध्यक्ष कोणताही अधिकार खेचून घेत नाही. अध्यक्ष केवळ संविधानातील तरतुदींविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे, असे नार्वेकर म्हणाले.
नार्वेकरांच्या या उत्तरावर पुन्हा एकदा भाष्य करताना राऊत म्हणाले की, मला अजिबात कायद्याचे ज्ञान नाही. नार्वेकर हे कायदेपंडित आहेत. यापूर्वी त्यांच्या खुर्चीवर कायद्याचे ज्ञान असणारे नरहरी झिरवळ बसले होते, त्यांनी १६ आमदारांना अपात्र केले आहे. झिरवळांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. त्या खुर्चीवर बसलेल्या एकालाच कायदा कळतो असे नाही. देशातील सामान्य नागरिकालाही संविधानाची माहिती आहे. स्वतःला कायदे पंडित समजणाऱ्या अध्यक्षांना माहीत नसेल, तर मला राज्याची काळजी वाटते, असे राऊत म्हणाले.