अमित शहा, शिंदे-फडणवीस यांच्यात पाऊण तास खल
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत पाऊण तास चर्चा केली. भाजप आमदार पराग अळवणी यांच्या पार्ल्यातील घरी झालेल्या या भेटीत त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला.
अमित शहा हे रविवारी मुंबई दौर्यावर आले होते. सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलेपार्ल्यातील केशवराव घैसास सभागृहात हजर राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शंभराव्या 'मन की बात' कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकले. यानंतर आ. अळवणी यांच्या निवासस्थानी अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा झाली. राज्यात सध्या अस्थिर राजकीय वातावरण आहे. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा देखील सुरू आहेत. मात्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हे कायम राहतील आणि 2024 च्या निवडणुका या त्यांच्याच नेतृत्वाखालीच लढण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. या चर्चेत शहा यांनी शिंदे-फडणवीस यांना अधिक समन्वय राखून काम करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांत अमित शहा यांचे राज्यात दौरे वाढले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
मुंबईत पाच हजार ठिकाणी 'मन की बात'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' संवादाचा शतकोत्सव मुंबईसह उपनगरातील 36 विधानसभा क्षेत्रात पाच हजाराहून अधिक ठिकाणी साजरा करण्यात आला. अमित शहा यांच्या उपस्थितीने पार्ल्यात भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनीही समाजघटकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.