दसरा आणि दिवाळी मुहूर्तांपूर्वीच वाहन उद्योगाचे सीमोल्लंघन! - पुढारी

दसरा आणि दिवाळी मुहूर्तांपूर्वीच वाहन उद्योगाचे सीमोल्लंघन!

मुंबई ; चेतन ननावरे : लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ झटकून राज्यातील वाहन उद्योगाने यंदाच्या विजयादशमीपूर्वीच वाहनविक्रीचे सीमोल्लंघन केल्याचे सुखद वृत्त आहे. दसरा आणि दिवाळी या मोठ्या मुहूर्तांपूर्वीच राज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चारचाकी विक्रीत तब्बल 40 टक्क्यांची वाढ झाली आहे.

विशेषत: दुचाकी आणि शेतीसाठी आवश्यक ट्रॅक्टरच्या विक्रीतही यंदा उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. परिणामी, येत्या दोन महिन्यांत राज्यातील वाहन विक्री टॉप गिअरवर असेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, गेल्यावर्षी संपूर्ण वर्षभरात राज्यात 2 लाख 57 हजार 533 चारचाकी वाहनांची विक्री झाली होती. यंदा मात्र 13 ऑक्टोबरपर्यंतच चारचाकी वाहन विक्रीचा आकडा 2 लाख 68 हजार 064 पर्यंत पोहचला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सप्टेंबरपर्यंत 40 टक्क्यांची वाढ झाली आहे.

त्यात जानेवारी ते सप्टेंबर 2020 या काळात फक्त 1 लाख 54 हजार 111 चारचाकी विकल्या गेल्या होत्या. याउलट यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांत तब्बल 2 लाख 56 हजार 606 चारचाकी विकल्या गेल्या.

राज्यात 2020मध्ये एकूण 12 लाख 81 हजार 591 दुचाकींची विक्री झाली होती. त्यात जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांत 7 लाख 96 हजार 437 दुचाकी विकल्या गेल्या होत्या. याउलट यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांत तब्बल 8 लाख 86 हजार 777 दुचाकींची विक्री झाली आहे. त्यात अद्याप दसरा आणि दिवाळी हे खरेदी-विक्रीसाठी पोषक असे दोन मोठे मुहूर्त तोंडावर आहेत.

राज्यातील माल वाहतूक वाहनांच्या संख्येतही 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी पहिल्या तीन तिमाहीत 46 हजार 637 माल वाहतूक वाहनांची विक्री झालेल्या महाराष्ट्रात यंदा 57 हजार 935 माल वाहतूक वाहने विकली गेली.

Back to top button