बारावीतील विद्यार्थिनीच्या गुणपत्रिकेत घोळ; गणिताऐवजी दिले जीवशास्त्राचे गुण - पुढारी

बारावीतील विद्यार्थिनीच्या गुणपत्रिकेत घोळ; गणिताऐवजी दिले जीवशास्त्राचे गुण

मुंबई  ; पुढारी वृत्तसेवा : बारावीतील विद्यार्थिनीच्या गुणपत्रिकेत घोळ करून गणिताऐवजी जीवशास्त्राचे गुण देणार्‍या नाशिकच्या ब्रह्म व्हॅली महाविद्यालयाला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला.

न्यायमूर्ती शाहरुख कांथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने या महाविद्यालयाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि विद्यार्थिनीच्या गुणपत्रिकेत सुधारणा कऱण्याचे निर्देशही महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिले.

नाशिक पंचवटी येथील स्नेहल देशमुखने या विद्यार्थिनीने ब्रह्म व्हॅली महाविद्यालयातून बारावीची परीक्षा देताना गणित विषय निवडला होता. मात्र गुणपत्रिकेत गणिताऐवजी जीवशास्त्र विषयात 84 गुण देण्यात आले. दीड महिना राज्य शिक्षण मंडळ आणि महाविद्यालयाकडे पाठपुरावा करूनही दुरुस्ती झाली नाही. अखेरीस तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख कांथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली.

स्नेहलला चुकीच्या विषयात गुण देण्यात आल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी अर्ज करता येत नाही. याला महाविद्यालय व्यवस्थापनाचा सावळागोंधळच कारणीभूत असल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला. महाविद्यालयानेही चूक मान्य करत स्नेहलच्या गुणपत्रिकेत सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितलेे.

राज्य सरकारच्या जुलै 2021 मधील जीआरनुसार, महाविद्यालयाने शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीत विद्यार्थ्यांचा डेटा समाविष्ट केल्यानंतर त्यात कोणताही बदल, गुणांची पडताळणी अथवा पुनर्मूल्यांकनाचीही तरतूद नाही. त्यामुळे स्नेहलच्या निकालात कोणतीही सुधारणा करण्याचा अधिकार नसल्याची भूमिका शिक्षण मंडळाने मांडली. याची खंडपीठाने गंभीर दखल घेतली.

बारावीतील परीक्षेच्या निकालात कोणतीही त्रुटी, गैरवर्तन, फसवणूक, अयोग्य आचरण किंवा इतर कोणत्याही प्रकारामुळेे निकाल प्रभावित झाल्याचे आढळल्यास स्थायी समितीच्या शिफारशीनुसार शिक्षण मंडळाला निकालात सुधारणा करण्याचा अधिकार असल्याचे खंडपीठाने शिक्षण मंडळाच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थिनीचा कोणताही दोष नसतानाही तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट करत गुणपत्रिकेत सुधारणा कऱण्याचे निर्देश शिक्षण मंडळाला दिले. उच्च न्यायालयाने ब्रह्म व्हॅली महाविद्यालयाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावत याचिका निकाली काढली.

Back to top button