मंदिरांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशीही शुकशुकाट | पुढारी

मंदिरांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशीही शुकशुकाट

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिकेची जाचक नियमावली आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये गुरुवारी घटस्थापनेच्या मुहुर्तावर मुंबईतील मंदिरांची दारे भक्तांसाठी खुले झाली. मात्र क्यूआर कोड आणि ऑनलाईन नोंदणीअभावी हजारो भाविकांना देवाचे दर्शन न घेताच माघारी परतावे लागल्याचे चित्र मुंबईतील मंदिरांबाहेर दिसले. परिणामी, मुंबईतील मुंबादेवी आणि महालक्ष्मी या मंदिरांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशीही शुकशुकाट जाणवला.

प्रत्येक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मुंबईच्या महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिराबाहेर पहाटेपासूनच लाखो भाविक दर्शनासाठी रांग लावतात. यांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक असते. यंदा मात्र मंदिराबाहेर जेमतेम 50 ते 100 भाविकही दिसत नव्हते.एरव्ही तासन्-तास रांगेत उभ्या राहणार्‍या भाविकांना या वर्षी पूर्व नोंदणी केल्यामुळे अवघ्या 15 मिनिटांत दर्शन मिळाले.

महालक्ष्मी मंदिरांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भाविकांना प्रवेशद्वार क्रमांक 2 मधून प्रवेश देण्यात येत होता. नोंदणी तपासण्यासाठी पोलीस आणि स्वयंसेवकांची फौज तैनात करण्यात आली होती. महापालिकेच्या नियमावलीनुसार, 10 वर्षांखालील मुलांना आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना महालक्ष्मी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला.

मंदिराच्या मुख्य दारावर आल्यानंतर वयाने अधिक वाटणार्‍या ज्येष्ठ नागरिकांचे आणि वयाने लहान वाटणार्‍या याठिकाणी जेमतेम 25 ते 30 भाविकच दिसले. मंदिराच्या गाभार्‍याबाहेर 15 ते 20 भाविकांनाच प्रवेश दिला जात होता. मंदिर प्रशासनाने पहाटे 6 ते रात्री 9 या वेळेत दर्शनासाठी रांग खुली ठेवल्याचे स्पष्ट केले.

प्रत्येक नवरात्रीच्या पहिल्या माळेला 35 ते 40 हजार भाविकांची गर्दी होणार्‍या मुंबादेवी मंदिरात दिवसभर 3 ते साडेतीन हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचे श्री मुंबादेवी मंदिर चॅरिटीजचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना सांगितले.

जाधव म्हणाले की, पहिल्या दिवशी न भुतो न भविष्यतो एवढी गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाला वाटत होती. मात्र शासन नियमावलीनुसार 10 ते 65 वयोगटातील भाविकांना ऑनलाईन पूर्व नोंदणी करून दर्शन देण्याच्या नियमामुळे मर्यादित भाविकांना प्रवेश देत आहोत.

दरम्यान, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब आणि काही आमदारांनी मुंबादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली होती.

Back to top button