जि.प. पोटनिवडणुकांत ‘महाविकास’ची सरशी - पुढारी

जि.प. पोटनिवडणुकांत ‘महाविकास’ची सरशी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ओबीसी आरक्षणामुळे बहुचर्चित ठरलेल्या राज्यातील 6 जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकांत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. धुळे जिल्हा परिषदेव्यतिरिक्त अन्य चार जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीने विजयी पताका फडकावली. धुळ्यात भाजपने वर्चस्व कायम राखले आहे. पश्चिम विदर्भातील अकोल्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव कायम राहिला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात भाजपला फारशी चमक दाखविता आली नाही.

त्यांचे केवळ 3 उमेदवार विजयी झाले. शिवसेनेला तर खातेही उघडता आले नाही.

दरम्यान, पंचायत समिती निवडणुकांत सत्तारूढ महाविकास आघाडीने 144 पैकी 73 जागांवर विजय मिळविला. भाजपला 33 जागा मिळाल्या.

या निवडणुकांत जिल्हा परिषदेच्या 85 पैकी 22 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांनी एकूण 46 जागा जिंकल्या.

सर्वात कमी 12 जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. काँग्रेसला 19, तर राष्ट्रवादीला 15 जागा जिंकण्यात यश आले आहे.

जिल्हा परिषदांमधील ओबीसींचे अतिरिक्त आरक्षण रद्द करण्यात आल्याने नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांमधील 85 गट आणि पंचायत समित्यांच्या 144 गणांसाठी मंगळवारी पोटनिवडणूक पार पडली.

या निवडणुकांची मतमोजणी बुधवारी झाली. या निवडणुकांत राज्यातील ग्रामीण भागातील जनता कोणाला साथ देते, याबाबत उत्सुकता होती. बहुतांश ठिकाणी सर्वच पक्षांनी ओबीसी उमेदवार दिले होते.

धुळ्यात भाजपचे वर्चस्व

धुळ्यात माजी मंत्री अमरिश पटेल यांनी आपला गड राखला. तेथे भाजपला 15 पैकी 8 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला 3, तर काँग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी 2 जागा जिंकता आल्या.

अकोल्यात पुन्हा एकदा वंचितचा करिष्मा पाहायला मिळाला. 14 पैकी 7 जागा वंचितने जिंकल्या. प्रत्येकी 1 जागा भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने जिंकली, तर राष्ट्रवादीने दोन जागा जिंकल्या. पूर्वीप्रमाणे भाजपने मदत केल्यास वंचितला सत्ता राखता येणार आहे.

खासदार गावित यांना धक्का

पालघरमध्ये शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा धक्कादायकरीत्या पराभव झाला.

भाजप उमेदवार पंकज कोरे हे खासदारपुत्र रोहित गावित यांचा पराभव करून जायंट किलर ठरले. गावित यांनी प्रतिष्ठा पणाला लावून ही जागा मुलासाठी मिळविली होती.

माजी मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या सुप्रिया हिने मात्र नंदुरबारमध्ये विजय मिळवीत राजकारणात प्रवेश केला. गावित यांची एक कन्या डॉ. हिना गावित या खासदार आहेत.

या विजयानंतर डॉ. विजयकुमार गावित यांनी कन्या हिना केंद्रात, आपण राज्यात, तर सुप्रिया आता जिल्ह्यात राजकारण करणार असल्याचे सांगितले.

22 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष
महाविकास आघाडीचा 46 जागांवर विजय

Back to top button