शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर ! अनिल परबांविरुद्ध रामदास कदमांकडून सोमय्यांना रसद - पुढारी

शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर ! अनिल परबांविरुद्ध रामदास कदमांकडून सोमय्यांना रसद

मुंबई/खेड : पुढारी वृत्तसेवा राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खास विश्वासू अनिल परब यांना शिवसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनीच राजकीयद़ृष्ट्या अडचणीत आणल्याच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या क्लिप खेडमध्ये झालेल्या भर पत्रकार परिषदेत ऐकवल्या. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परब यांची ‘ईडी’कडे जी तक्रार केली, त्यासाठी खुद्द रामदास कदम यांनीच रसद पुरवली असल्याचा आरोप या क्लिपच्या आधारे करण्यात आल्याने शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

हा आवाज माझा नाहीच, असा दावा रामदास कदम यांनी केला असला तरी ‘हा आवाज कुणाचा?’ हा प्रश्न शिवसेनेसमोर आता
उभा ठाकला आहे. कारण आवाज कुणाचाही असला तरी सोमय्या यांना शिवसेनेतूनच रसद पुरवली गेली हे या क्लिपमधील संभाषणातून स्पष्ट झाले आहे.

शिवसेना नेते रामदास कदम आणि माहिती हक्क कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यात वेगवेगळ्या वेळी झालेल्या संभाषणाच्या तीन ऑडिओ क्लिप वैभव खेडेकर आणि संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत ऐकवल्या आणि त्या आता व्हायरल झाल्या आहेत.

संजय कदम म्हणाले की, रामदास कदम यांनी सोमय्या यांना प्रसाद कर्वे यांच्यामार्फत माहिती पुरवली हे संभाषण ऐकल्यावर स्पष्ट होते. मुंबईत अनिल परब यांचा बंगला तुटला तेव्हा बाजूने एकही प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली नाही. मात्र, बंगला तुटल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला. मुरुड येथील मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तुटताना ते गप्प बसतात. मंत्रिपद गेल्याने राजकारणाची एकही संधी रामदास कदम सोडत नाहीत.

कदम पिता-पुत्रांनी शिवसेनेला संपविण्याचा जणू विडा उचलला आहे, असे ही संजय कदम यांनी सांगितले.रामदास कदम यांनी राजकारण जरूर करावे. परंतु स्वतःला शिवसैनिक म्हणवणे सोडावे. रामदास कदम हे शिवपिंडीवर बसलेला विंचू असून आघाडीतील सूर्याजी पिसाळ आहेत. त्यांच्याबाबत वेळीच आघाडीतील तिन्ही पक्षांनी सावध होणे गरजेचे आहे, असा इशाराही संजय कदम यांनी दिला.

रामदास कदमांची टुकडे गँग!

वैभव खेेडेकर यांनी सांगितले की, किरीट सोमय्या यांना कोण माहिती पुरवते याची इत्थंभूत माहिती आपण दिली आहे. रामदास कदम यांनीच ही माहिती दिली असून त्यांच्याकडे होणार्‍या भोजनाला किरीट सोमय्या येतात. हा प्रकार राज्य सरकार अस्थिर करण्याचा दावा वैभव खेडेकर यांनी केला. दापोली मतदारसंघात रामदास कदम यांची ‘टुकडे गँग’ आहे.

माहिती अधिकाराचे अर्ज टाकून स्वतःचे ईप्सित साध्य करण्याचा प्रयत्न या गँगकडून होतो. रामदास कदम स्वतःला शिवसैनिक म्हणवतात मग उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अनिल परब ते खेडमधील बाळा खेडेकर यांच्याविरोधात माहिती मागवली ते शिवसैनिक नव्हते का, असा सवाल वैभव खेडेकर यांनी केला. किरीट सोमय्या कोकणात येऊन माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मिळवितात. यामध्ये स्थानिक मंडळींची साथ असल्याशिवाय एवढे मोठे ते धाडस करूच शकत नाहीत. त्यामुळेच यामध्ये काहीतरी तथ्य आहे.

खेडेकरांचा गुरूविरुद्ध पोटशूळ

या सर्व प्रकरणी ज्यांचे नाव वारंवार घेतले जाते, ते प्रसाद कर्वे यांनीही आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खेड नगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याची माहिती आपण माहिती अधिकार कायद्याखाली मिळवली. नगराध्यक्षांनी घोळ केले आहेत. त्यांना अपात्र ठरविण्यासाठीचा प्रस्ताव नगरसेवकांमार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे दिला आहे, असे सांगून प्रसाद कर्वे म्हणाले की, रामदास कदम आणि त्यांचा आमदार मुलगा हे दोघेही कोट्यवधी रुपयांचा निधी आणत असताना वैभव खेडेकर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करीत आहेत. त्यांना ज्यांनी राजकारणात उभे केले, त्या गुरूविरोधातच त्यांचा पोटशूळ असल्याचे कर्वे म्हणाले.

हा तर जावईशोध : रामदास कदम

माझे आणि किरीट सोमय्यांचे कधीही बोलणे झालेले नाही. त्यामुळे मी सोमय्यांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणे हा या दोघांनी लावलेला जावईशोध आहे. महाविकास आघाडीमधील शिवसेना हा एक पक्ष आहे. त्यामुळे माझ्याच पक्षाचे सरकार अस्थिर करण्याचा मी कसा प्रयत्न करेन? – रामदास कदम, शिवसेना नेते

म्हणे, क्लिप चोरीला गेल्या

प्रसाद कर्वे यांच्या माध्यमातून अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबत माहिती मिळविण्यात आली आणि तीच माहिती किरीट सोमय्या यांना देण्यात आली, असा दावा वैभव खेडेकर यांनी केला. प्रसाद कर्वे यांनी आपल्या क्लिप चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे आणि आता या क्लिप आपल्या नाहीत, असे ते म्हणत आहेत. हे सगळे गौडबंगाल काय आहे, असा सवाल खेडेकर यांनी केला.

Back to top button