एमपीएससी परीक्षेत कराडचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम | पुढारी

एमपीएससी परीक्षेत कराडचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा एमपीएससी (मुख्य) परीक्षा २०१९ मध्ये घेतलेल्या परीक्षेत सातारा, कराडच्या प्रसाद बसवेश्‍वर चौगुले यांनी 588 गुण घेत प्रथम क्रमांक मिळविला. तर राहेन रघुनाथ कुवर हे ५७१ मिळवत मागासवर्गीयात आणि महिला वर्गवारीतून मानसी सुरेश पाटील ह्या राज्यात प्रथम आल्या आहेत. एमपीएससी परिक्षेत त्यांना 528 गुण मिळाले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १३ ते १५ जुलै, २०१९ या कालावधीत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ घेण्यात आली होती. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार एसईबीसीची पदे खुल्या पदांमध्ये रुपांतरीत करुन ४२० पदांचा सुधारित अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे.

राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन निकाल तसेच नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका मध्यतरी घेतली होती.

आजच्या निकालात उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी पदांचा निकाल जाहीर झाला आहे.

दिव्यांग वर्गवारीतील उमेदवारांची प्रमाणपत्रे वैद्यकीय मंडळाकडून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शिफारस शासनाकडे करण्यात येत आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे

नेमणुकीपूर्वी उमेदवार संबंधित पदावर नियुक्तीसाठी सक्षम आहे किंवा नाही याची देखील वैद्यकीय मंडळाकडून तपासणी केल्यानंतर ते नेमणुकीसाठी पात्र ठरणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे. अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईल मध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे असे आयोगाने म्हटले आहे.

Back to top button