शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला | पुढारी

शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी सोमवारी 30 तारखेला मतदान होत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषतः नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवीत असल्याने या मतदारसंघात काय होते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोकण, नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक पदवीधर मतदारसंघ तसेच नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजप – शिंदे गट युती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये प्रतिष्ठेची लढत रंगली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत शेकापचे उमेदवार विद्यमान आमदार बाळाराम पाटील विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत रंगली आहे. यावेळी शिंदे गट आणि भाजपची ताकद कोकणात एकवटल्याने यावेळी बाळाराम पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः ही जागा शिंदे गटाकडे असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

औरंगाबाद विभागीय शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान उमेदवार विक्रम काळे विरुद्ध भाजपचे किरण पाटील यांच्यात चुरशीची लढत रंगली आहे. या निवडणुकीचा निकाल काय लागतो, याबाबतही मराठवाड्यात उत्सुकता आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार नागो गाणार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अपक्ष सतीश इटकेलवार यांच्यात सामना रंगला आहे. सुधाकर अडबाले यांनीही चांगली झुंज दिली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार माजी राज्यमंत्री रणजित पाटील हे हॅट्ट्रिक करतात काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगडे यांच्याशी आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत; 22 जण रिंगणात

 विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघात एकूण 22 उमेदवार रिंगणात असले, तरी तीन प्रमुख उमेदवारांमध्येच खरी लढत होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 16 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2 फेब्रुवारीला याच ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. नागपूरची जागा कोणत्याही स्थितीत राखण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ताकदीने प्रचारात उतरल्याचे दिसून आले. तसेच कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडविण्याचा निर्धार करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी शक्ती पणाला लावली. मात्र, सेनेचा उमेदवार बदलणे, पाठिंब्यावरून झालेल्या राजकीय घडामोडी पाहता मविआत एकजूट पाहायला मिळाली नसल्याने निकालाबाबतही अनिश्चितता आहे.

Back to top button