Shiv Sena symbol row | शिवसेना पक्ष, धनुष्यबाण कुणाचा?; आज फैसला की निर्णय राखून ठेवणार? | पुढारी

Shiv Sena symbol row | शिवसेना पक्ष, धनुष्यबाण कुणाचा?; आज फैसला की निर्णय राखून ठेवणार?

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन :  धनुष्यबाण कोणाचा? ठाकरे की शिंदे गटाचा, याबाबतचा युक्तिवाद निवडणूक आयोगात पूर्ण झाला आहे. दरम्यान, आज सोमवारी दोन्ही गट निवडणूक आयोगासमोर आपले लेखी म्हणणे मांडणार आहे. यानंतर निवडणूक आयोग आपला अंतिम निर्णय देणार आहे. आजच यावर निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. (Shiv Sena symbol row)

धनुष्यबाण चिन्हावर कोणाचा अधिकार, याबाबत निवडणूक आयोगात गेल्या दोन महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. ३० जानेवारीला कोणत्याही गटाचा तोंडी युक्तिवाद होणार नाही. ३० तारखेपर्यंत दोन्ही गटांना गरजेनुसार लेखी म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, शिंदे गट आज लेखी उत्तर सादर करणार आहे. निवडणूक आयोगाचा फैसला कोणाच्या पारड्यात जाणार, याबाबतची राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे.

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे? या मुद्दयावर २० जानेवारीला निवडणूक आयोगासमक्ष सुनावणी झाली होती. यासंदर्भात आता निर्णय आज ३० जानेवारीनंतर होण्याची शक्यता आहे. याधीच्या सुनावणीवेळी जवळपास साडेतीन तासांहून अधिक काळ युक्तिवाद झाला होता. यए युक्तिवादानंतर दोन्ही गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ३० जानेवारीपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटाचा युक्तिवाद पुर्ण झाला आहे. लेखी उत्तर सादर केल्यानंतर आयोगाकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

काय झाला होता युक्तिवाद?

बंडखोरीनंतर झालेल्या शिवसेनेच्या दोन बैठकांना उपस्थित राहण्याचे आदेश काढूनही बंडखोर हजर राहिले नाहीत. लोकशाहीनुसार म्हणणे मांडायला हवे होते, गुवाहाटीला का गेले? पक्षाच्या सभेला उपस्थिती न लावता ते गुवाहाटीला गेले, असे ठाकरे गटाकडून आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. निवडणूक आयोगात येण्याचे ठरल्यानंतर एक दिवसाआधी प्रतिनिधी सभा घेतल्याचा आरोप युक्तिवाद दरम्यान ठाकरे गटाने केला होता.

दरम्यान २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाद द्या अथवा निवडणूक घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. आयोगाने मात्र दोन्ही गटांना लिखित उत्तर सादर करण्याचे निर्देश दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाच्या कार्यकाळासंबंधी कुठलाही निर्णय अद्याप होवू शकला नाही.

आमदार-खासदार मोजायचे असतील तर विधानसभा-विधान परिषद, लोकसभा-राज्यसभा असे मोजण्यात यावे. विधीमंडळ आणि संसदेत आमचीच संख्या अधिक आहे, असा दावा सुनावणीदरम्यान ठाकरे गटाने आयोगासमक्ष केला. प्रतिनिधी सभा पक्ष चालवतो. पंरतु, पक्ष सोडून गेलेले प्रतिनिधी सभेचा भाग होवू शकत नाहीत, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता.

सिब्बल यांच्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने अॅड. देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला होता. शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य आहे. प्रतिनिधी सभा ठाकरे गटाकडेच आहे. मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होवू शकत नाही, असा युक्तिवाद कामत यांनी केला होता.

दरम्यान शिंदे गटाचे वकील मेहश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात प्रतिनिधी सभेवरून शाब्दिक चकमक उडाली होती. यावेळी आयोगाने मध्यस्थी केली. ”याचिकेत जे आहे तेच बोला”, असे जेठमलानी यांनी कामत यांना सूचना केली. पंरतु, मी माझ्या पद्धतीने बोलणार, असे प्रत्युत्तर कामत यांनी जेठमलानी यांना दिली. महाराष्ट्रात शिंदे गटाने घटनाबाह्य विभागप्रमुख नेमले. पंरतु, मुंबईत घटनेप्रमाणे विभागप्रमुख नेमले असा युक्तिवाद ठाकरे गटाने केला. जवळपास अडीस तास ठाकरे गटाचे वकील सिब्बल आणि कामत यांनी युक्तिवाद केला होता.

पंरतु, प्रतिनिधी सभा केवळ तुमचीच कशी असू शकते? असा सवाल जेठमलानी यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी कशी बनवली? युतीचे आश्वासन देवून मत मिळवली आणि नंतर मतदारांना सोडून दिले. ठाकरे गटाचे काम आयोगाच्या घटनेनुसारच, शिंदे शिवसेनेत होते, मग शिवसेना बोगस असे कसे म्हणू शकतात, असा सवाल कामत यांनी केला होता. (Shiv Sena symbol row)

 हे ही वाचा :

Back to top button