मला तुरुंगात टाकण्याचा ‘मविआ’चा डाव होता! : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

मला तुरुंगात टाकण्याचा ‘मविआ’चा डाव होता! : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षांत आपल्यावर केसेस टाकण्याचे तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि आपल्याला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आले होते, असा जोरदार गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिसत असलेल्या वैराबाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, मी राजकीय वैर बाळगत नाही; पण मागच्या अडीच वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याचे, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे, जेलमध्ये टाकण्याचे टार्गेट तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिले होते; पण मी असे काहीच केले नसल्याने ते मला तुरुंगात टाकू शकले नाहीत. त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत; पण कुठल्याही परिस्थितीत मला अडकवा आणि जेलमध्ये टाका, असे आदेश महाविकास आघाडी सरकारमधील होते. हेदेखील सत्य आहे.

‘मातोश्री’चे दरवाजे त्यांनी बंद केले

2019 च्या विधानसभा निकालानंतर काय फिस्कटले हे सांगताना फडणवीस म्हणाले की, माझे उद्धव ठाकरे यांच्याशी वैर आजही नाही. त्यांनी ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी बंद केले. माझा फोनदेखील त्यांनी घेतला नाही. पाच वर्षे सोबत काम करतो, सरकार चालवतो, अशा स्थितीत साधे सौजन्य दाखवून फोन उचलत मला तुमच्यासोबत यायचे नाही, असे सांगू शकला असता; पण माझ्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे बंद केले याचे मला खूप दुःख आहे.

राज्यपाल आधीपासून म्हणत आहेत…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची विनंती केल्याबाबत फडणवीस म्हणाले की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यपाल खासगीत सांगत आहेत की, मला परत जायचे आहे. तब्येतही साथ देत नाही. हे सरकार येण्याआधीपासून राज्यपाल परत जायचे म्हणत आहेत. राज्यपालांना कोणीही राजीनामा देण्यास सांगितलेले नाही.

आंबेडकर-ठाकरे युतीचा परिणाम होणार नाही

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांची सोमवारी युतीची घोषणा केली. त्यावर बोलताना फडणवीस यांनी या युतीचा फारसा परिणाम होणार नाही, असे विधान केले. भाजपला पराभूत करण्यासाठी हे दोन्ही पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड करायाला तयार आहेत; पण जनतेला हे सर्व काही समजत असल्याचे फडणवीस म्हणाले.

वळसे-पाटलांनी आरोप फेटाळले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. देवेंद्र फडणवीस नेमकेकाय बोलले, हे मी ऐकले नाही. मात्र, त्यांनी जो आरोप केला आहे, तसा कोणताही प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात झाला नाही. फडणवीस हे त्यांना असलेल्या माहितीच्या आधारे बोलले असतील. मात्र, मला जी माहिती आहे, त्यानुसार तेव्हाच्या राज्य सरकारने असा कोणताही प्रयत्न केला नव्हता, असेही ते म्हणाले.

Back to top button