मुंबईत 'हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग' स्थापन करा : आशिष शेलारांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र | पुढारी

मुंबईत 'हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग' स्थापन करा : आशिष शेलारांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : ठाकरे सरकारने बिल्डरांवर सवलतींची खैरात केल्यामुळे मुंबईत एकाच वेळी पंधराशेहून अधिक बांधकामे सुरु झाली. यातील डेब्रिज, धूळ यामुळे मुंबईतील प्रदूषण एका भयंकर टप्प्यावर पोहचली आहे, असा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईसाठी “हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग” स्थापन करावा, अशी मागणी केली आहे.

आमदार शेलार यांनी पत्रात म्हटले आहे की, हिवाळ्यात मुंबईतील हवेची पातळी प्रचंड घसरली व दिल्ली पेक्षा मुंबईतील हवा ही अत्यंत दुषित असल्याचे दिसून आले आहे. मुंबई भारतातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये गणली गेले आहे. मुंबईतील या सततच्या प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि विविध शिष्टमंडळांनी मला निवेदने दिली असून याबाबत उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. मुंबईतील प्रदुषणात अचानक यावेळी झालेली वाढ ही बांधकामांमुळे झाली असून सुमारे ५० टक्के प्रदूषण हे बांधकामांमुळे होतं आहे, असे मत माध्यमांनी आणि काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आघाडी सरकारच्या काळात बांधकाम व्यवसायाला सवलतींची खैरात करण्यात आली. त्यामुळे यावेळी मुंबईत मोढ्या प्रमाणात बांधकामे सुरू झाली. त्याचा परिणाम हवा प्रदुषणावर झाला. मुंबईत पंधराशेहून अधिक पुनर्विकासाचे बांधकाम प्रकल्प सुरू असून कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता या कामांच्या परवानग्या देण्यात आल्याने त्याचा फटका वातावरणाला बसला आहे.

गंभीर बाब म्हणजे वातावरणातील या बदलांचे मुंबई महापालिकेच्या शहर नियोजन अथवा आपत्कालीन विभागाकडे याबाबत नोंदी करुन त्याचे वैज्ञानिक पृथ्थ्करण करण्यात येत नाही, त्यामुळे सर्वंकष विचार करणे आवश्यक आहे. मुंबई आणि एमएमआरमधील प्रदूषण एका भयंकर टप्प्यावर पोहचले असून याकडे वैज्ञानिकदृष्टया पाहणे आवश्यक आहे. तसेच मूळ कारणांचा शोध घेऊन उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.

Back to top button