दुसर्‍याचे वडील चोरताना स्वतःचे वडील विसरू नका : उद्धव ठाकरे | पुढारी

दुसर्‍याचे वडील चोरताना स्वतःचे वडील विसरू नका : उद्धव ठाकरे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : दुसर्‍याचे वडील चोरता चोरता स्वतःचे वडील विसरू नका, असा थेट टोला शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवारी लगावला. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा येथील षण्णमुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणावरून ठाकरे यांनी यावेळी शिंदे गटावर निशाणा साधला. विधानभवनातील तैलचित्र मी पाहिलेले नाही. हे चित्र चितारणार्‍या कलाकारांचा मला अपमान करायचा नाही; पण त्यांना पुरेसा वेळ दिला का? घाईगडबडीत काही तरी रंगवून ठेवायचे आणि हे तुझे वडील करायचे, हे मान्य नाही. वडील चोरता चोरता स्वतःचे वडील विसरू नका, असा टोला लगावतानाच बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याची त्यांची  कृती चांगली असेल; पण त्यांचा हेतू वाईट असल्याचा दावाही ठाकरे यांनी यावेळी केला. वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले की, आता वारशांचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. त्यामुळे डोक्यावर बसणार्‍यांना आता जा तू म्हणणार आहोत. भाजपचे हिंदुत्व हे थोतांड आहे. त्याआडून आपल्या डोक्यामध्ये नसलेल्या भिंती उभारायच्या आणि आपली पोलादी पकड मजबूत करायची, असा प्रकार असल्याचेही ठाकरे म्हणाले.

आर्थिक केंद्रे आणि प्रकल्प पळवून नेल्यानंतरही मुंबईत पैसा आहे. मुंबईला कंगाल करण्यासाठीच भाजपची नजर आता पालिकेच्या ठेवींवर गेली आहे. त्यांना मुंबई ही सोन्याची कोंबडी वाटते, त्यांना ती कापायची आहे, असा आरोप करतानाच त्यांच्याकडे गेलेले गुलाम मुंबईचा हा पैसा सुरत, दिल्लीला घेऊन जातील. हे कसले बाळासाहेबांचा विचार घेऊन जाताहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. तसेच तुम्ही मोदींचा फोटो लावा, आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो… महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय मते मिळवून दाखवाच, असे खुले आव्हानही दिले.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईचा दौरा करत विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच पालिकेतील ठेवी आणि मुंबईतील अव्यवस्थेवरून शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्याला आज ठाकरे यांनी उत्तर दिले. महाविकास आघाडीने तीन वर्षे केलेल्या कामांचेच पंतप्रधान मोदींनी मुंबईत भूमिपूजन केले. भाजपचा आता मुंबई महापालिकेच्या एफडीवर डोळा आहे.‘बुरी नजरवाले तेरा मोह काला,’ अशी त्यांची स्थिती आहे; पण त्यांचे तोंड काळे करणार, मराठी माणसाची मुंबई त्यांच्या हाती जाऊ देणार नाही. लवकरच एक सभा घेत सविस्तर समाचार घेणार असल्याचा इशारा देत उद्धव ठाकरे यांनीदेखील आज भाजपपाठोपाठ मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. अंध भक्तांसारखे त्यांचे गुरूही अंध आहेत. 2002 पर्यंत मुंबई महापालिका तोट्यात होती. त्यानंतर विविध आयुक्त आणि नगरसेवकांनी योग्य मांडणी केल्याने या ठेवी तयार झाल्या आहेत. यातूनच टोलमुक्त कोस्टल रोड, एसटीपी प्रकल्पाची कामे पालिका करत आहे. शिवाय, या ठेवीतील 40 टक्के रक्कम कर्मचार्‍यांची पेन्शन, ग्रॅच्युईटीसाठी आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

देश हुकूमशाहीच्या दिशेने

देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे. हिंदुत्वाच्या आधारावर धोक्याची भिंत उभी करायची आणि त्याआडून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे यांच्यापूर्वी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली. उद्धव ठाकरे हे आपले सदैव पक्षप्रमुख आहेत. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे सगळे कागदी प्रकार आहेत आणि आपण कागदी वाघ नाही. शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला इतिहास आहे, असे राऊत म्हणाले.

Back to top button