शिवशक्ती-भीमशक्ती युतीच्या घोषणेची आज शक्यता | पुढारी

शिवशक्ती-भीमशक्ती युतीच्या घोषणेची आज शक्यता

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे शिवशक्ती-भीमशक्ती युतीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मिळणारे स्पष्ट संकेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या युतीबाबत बाळगलेले प्रदीर्घ मौन, यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अजूनही युतीच्या घोषणेच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेचे मित्रपक्ष म्हणून वंचित आघाडी पुढे जाते की महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून मान्यता मिळते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी युतीची घोषणा होईल, मनातून सगळे ठरले आहे, अशी शक्यता ठाकरे गटातील नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. शिवशक्ती-भीमशक्ती युतीची सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त घोषणा होईल, असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. दोन मोठे पक्ष एकत्र येत असताना मोठी प्रक्रिया असते, चर्चा करावी लागते. मनातून सगळे ठरले आहे, असेही देसाई म्हणाले. तर राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणे महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन ताकद वाढविणे आवश्यक असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी मांडले आहे. आज घोषणा होण्याची चिन्हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यात युतीची घोषणा होईल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

Back to top button