मुंबई : सांताक्रुझमध्ये सव्वा कोटींच्या ड्रग्जची तस्करी करणारा जेरबंद | पुढारी

मुंबई : सांताक्रुझमध्ये सव्वा कोटींच्या ड्रग्जची तस्करी करणारा जेरबंद

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सांताक्रुझमध्ये ड्रग्ज घेऊन आलेल्या एका २६ वर्षीय तस्कराला मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली पथकाने बेड्या ठोकल्या. या आरोपीजवळून पोलिसांनी तब्बल १ कोटी ३० लाख रुपये किंमतीचे ३२५.१ ग्रॅम हेरॉईन आणि ४ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. आरोपीला अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे.

कांदिवली कक्षाचे प्रमुख प्रभारी पोलीस निरीक्षक रुपेश नाईक हे त्यांच्या पथकासह २० जानेवारीच्या रात्री साडेनऊच्या सुमारास सांताक्रुझ परिसरात गस्त घालत होते. या पथकाला एक संशयित पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला उड्डाणपुलाच्या खाली उभा असल्याचे दिसले. पोलीस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेत त्याच्याजवळील पिशवीची झडती घेतली असता त्यात २७५ ग्रॅम हेरॉईन पोलिसांना सापडले.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आणखी अंमली पदार्थ त्याच्या घरी लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या व्यक्तीच्या घरातून ५०.१ ग्रॅम हेरॉईन आणि अंमली पदार्थ विक्रीतून जमा केलेली ४ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. पोलिसांनी या व्यक्तीकडून एकूण १ कोटी ३० लाख ०४ हजार रुपये किंमतीचे ३२५.१ ग्रॅम हेरॉईन जप्त केल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button