नागपुरात सुधाकर अडबालेंना ‘मविआ’चा पाठींबा : नाना पटोले | पुढारी

नागपुरात सुधाकर अडबालेंना 'मविआ'चा पाठींबा : नाना पटोले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा- विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले होते. आता सत्यजित तांबेवरही कारवाई केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

विधान परिषद निवडणुकीबाबत मविआमध्‍ये समन्वय

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत समन्वय असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रीत चर्चा करून नाशिक व नागपूर मतदार संघाबाबत निर्णय घेतलेला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली असतानाही त्यांनी पक्षाशी बेईमानी करत अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला व नागपूरमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना मविआचा पाठिंबा आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नागपुरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लींगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील व कोकणमधून बाळाराम पाटील असतील. विधान परिषदेच्या या पाचही जागांवर महाविकास आघाडीतील पक्ष कार्यकर्ते एकदिलाने काम करून या पाचही जागा विजयी करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस पक्षाचा पाठिंबाच आहे. म्हणून तर काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगड व हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. परंतु भाजपशासित राज्यांत ही योजना लागू केली जात नाही. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या मुद्द्यांवरून भाजपविरोधात तीव्र संताप आहे. महागाई, बेरोजगारी हे मुद्देही महत्वाचे आहेत. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला उमेदवारही मिळाला नाही. भाजप हा दुसऱ्यांची घरे फोडणारा पक्ष असून पाठीमागून वार करणाऱ्या भाजपला जनताच धडा शिकवेल, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते व विधान परिषदचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button