शिवसेना म्हणते, “…नाहीतर ओवेसींकडे अंगवस्त्र म्हणूनच पाहिले जाईल” | पुढारी

शिवसेना म्हणते, "...नाहीतर ओवेसींकडे अंगवस्त्र म्हणूनच पाहिले जाईल"

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामनाच्या अग्रलेखातून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींवर शिवसेनेने तोफ डागली आहे. शिवसेना म्हणते, “पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत जाऊन धर्मांधता, दहशतवाद, फुटीरतावाद वैगेरेंवर जोरदार भाषण केलं, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण, त्याचवेळी आपल्याच देशात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ नारे दिले जातात, याला काय म्हणायचे?

मोदी, योगींसारखे प्रखर राष्ट्रभक्त हिंदुत्ववादी नेते राज्यात आणि देशात सत्तेवर आहेत, याचा ‘पाकिस्तान झिंदाबाद’वाल्यांना विसर पडला आहे”, असा घणाघात शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून म्हणचेच सामनातून पाकिस्तानधार्जीण लोकांवर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्यावर केला आहे.

ओवेसींवर टीका शिवसेना म्हणते की, “ओवेसी हे ठिकठिकाणी भडकावू भाषणे देऊन बेबंद समर्थकांची डोकी भडकवतात आणि ते ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे सुरू होतात. ओवेसींनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही असंच घाणेरडं राजकारण केलं. पण, तिथल्या जनतेनं ओवेसींच्या गलिच्छ राजकारणाला झिडकारलं.

बिहारमध्येही असेच उपद्व्याप केले, त्यामुळेच तेजस्वी यादव यांचा निसटता पराभव झाला. जर ओवेसांनी धर्माचा थयथयाट केला नसला तर बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या हाती सत्तेची सूत्रं असती. पण, धर्मांधतेचा आधार घेत मतविभागी घडवायचीच व विजय विकत घ्यायचा हे व्यापारी धोरण एकदा ठरले की, दुसरे काय घडायचे”, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

“या धार्मिक युद्धात पुन्हा काहीजणांची डोकी फुटतील, रक्त सांडवले जाईल. निवडणुकांचा हा असा लोकशाही खेळ सुरूच राहील. रायबरेलीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणा म्हणजे राष्ट्रभक्तांच्या छातीवर केलेले वार आहे. ओवेसी आणि त्यांच्या एमआयएम पक्षाचे नक्की धोरण काय आहे”, अशी प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

“ओवेसीसीरख्यांना येथील मुसलमान नेता मानायला तयार नाहीत. ओवेसी आणि त्यांच्यासारखे नेते पुढारी आतापर्यंत अनेकदा तयार झाले व काळाच्या ओघात नष्टही झाले. देशाच्या राजकारणात मुस्लिम समाजाला डावलता येणाक नाही. मुस्लिमांनी राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय त्यांचे हक्क, प्रतिष्ठा मिळणार नाही, हे सांगण्याचे धाडस ओवेसी यांच्यासारखे नेते दाखविणार नसतील तर आतापर्यंत मतविभागणी करून आपल्या सुपारीबाज मायबापांना मदत करणाऱ्यांपैकी एक असेच ओवेसींचे नेतृत्व राहील”, असाही टोला शिवसेनेने ओवेसींना लगावला आहे.

“मुसलमान या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांना या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला राहिजे, असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल, त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल”, अशीही मार्मिक टीका शिवसेने ओवेसींवर केली आहे.

पहा व्हिडीओ : स्त्रीच्या कर्तुत्वाला सन्मान देणारी अमृता फडणवीसांची गणेश वंदना

Back to top button