काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला | पुढारी

काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेस नेते सत्यजित तांबे आणि डॉ. सुधीर तांबे यांनी केलेल्या बंडखोरीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. तांबे प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याचे समजते. थोरात यांनी सुधीर तांबे हे उमेदवारी अर्ज भरतील, अशी खात्री दिल्यानेच आम्ही बेसावध राहिलो, अशी माहिती पटोले यांनी हायकमांडला दिल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

दुसरीकडे, पटोले यांनाच पदावरून तत्काळ हटवण्याची मागणी नागपूर येथील माजी आमदार आशिष देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. या घडामोडी सुरू असतानाच नागपूर शिक्षक मतदारसंघात पाठिंबा देण्याबाबतची बैठक माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाली. पटोले यांच्या गैरहजेरीत झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस समर्थित उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत खदखद बाहेर आल्याचे मानले जात आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज न भरता पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे तांबे पिता-पुत्राने ऐनवेळी दगा दिल्याने काँग्रेसची कोंडी झाली. तेथे काँग्रेसला उमेदवारी गमवावी लागली आहे. त्यामुळे काँग्रेसची पुरती नाचक्की झाली.

बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांचे नाते मामा-भाचेअसे आहे. ही जागा कायम डॉ. सुधीर तांबे यांना देण्यात आली आहे. यावेळी सत्यजित तांबे हे काही तरी वेगळे करण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. भाजपच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात होते. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी सुधीर तांबे यांच्याच उमेदवारीचा आग्रह धरत कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र तांबे पिता-पुत्रांनी बंडखोरी करत काँग्रेसला धक्का दिला.

थोरात यांना आपल्या घरातील राजकारण हाताळता आले नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवून डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय झाला; पण तो फसला, अशी माहिती पटोले यांनी वरिष्ठांना दिल्याची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. त्याचे पडसाद प्रदेश काँग्रेसमध्ये उमटू शकतात.

Back to top button