मुंबई पालिका आयुक्तांची ईडी कार्यालयात चौकशी; कागदपत्रांची केली तपासणी | पुढारी

मुंबई पालिका आयुक्तांची ईडी कार्यालयात चौकशी; कागदपत्रांची केली तपासणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई पालिकेच्या इतिहासात प्रथमच पालिका आयुक्तांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (दि.१६) चौकशी केली. कोरोना काळात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ‘ईडी’ने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना नोटीस बजावली होती.  आज सकाळी चहल ‘ईडी’ कार्यालयात दाखल झाले. अधिकाऱ्यांनी त्‍यांच्‍याकडून कोरोना काळात झालेल्या खर्चाची माहिती घेतली. तसेच  तपास करण्यासाठी कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.

मुंबईतील कोविड केंद्रांसह विविध उपाययोजना व खरेदी झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती.  आयुक्तांनी ईडीच्या तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आज ईडी कार्यालयात प्रत्यक्ष हजेरी लावून कोरोना काळात खर्च करण्यात आलेली कागदपत्र ईडीकडे सुपूर्द केली. शिवाय कोरोना काळात झालेला खर्च हा पारदर्शक असल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

कोरोना काळात मुंबईतील कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत ठाकरे सरकारने घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात ‘एफआयआर’ही नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची ‘ईडी’कडून चौकशी केली जात आहे. कोविड काळातील घोटाळ्यासह मुंबई महापालिकेने दिलेल्या अन्य कंत्राटाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने कॅगला दिले होते. त्यानंतर ‘ईडी’नेही नोटीस बजावल्यामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांसह तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेतील नेतेही हादरले आहेत. दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी पालिकेतील अजून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेत्यांचीही होणार चौकशी

कोरोना काळातील घोटाळ्या प्रकरणी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी महापौर माजी आरोग्य समिती अध्यक्ष यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Back to top button