मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंचचा (Circuit Bench Kolhapur ) प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. राज्य सरकारचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी रविवारी झालेल्या 'मुंबई मॅरेथॉन'मध्ये डोळ्यावर काळी पट्टी बांधून सहभाग नोंदवून प्रतीकात्मक पद्धतीने शासनाचा निषेध केला.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न ३५ वर्षांपासून या जिल्ह्यातील वकील बांधव, पक्षकार करीत आहेत.. यासाठी ८ सलग वर्षे मुंबईतील मॅरेथॉनमध्ये कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव हे सहभाग घेतात. रविवारी मुंबई मॅरेथॉनमध्ये त्यांनी 'वुई वॉन्ट हायकोर्ट बेंच इन कोल्हापूर चा टी-शर्ट परिधान करून व डोळ्यावर काळी पट्टी बांधून ४२ किलोमीटर या प्रकारात सहभाग घेतला होता.
मॅरेथॉनचे अंतर झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून अतिरिक्त धाव घेत ते उच्च न्यायालयाच्या परिसरापर्यंत गेले. तेथे त्यांनी समारोप केला. यावेळी प्रसाद जाधव म्हणाले, सहा जिल्ह्यांतील सुमारे २ कोटी लोकांचा हा प्रश्न आहे. याप्रश्नी या जिल्ह्यांत विविध आंदोलने झाली आहेत. कोल्हापूर सर्किट बेंचच्या या प्रश्नाकडे राज्य सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रतीकात्मक पद्धतीने डोळ्यावर काळी पट्टी बांधून मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. प्रथम कोल्हापूर सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, ही मागणी असून हा प्रश्न लवकर सोडवला जावा, अशी त्यांनी मागणी केली.
हेही वाचा