भाजपचे तीन उमेदवार जाहीर; विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे गटासोबत युती | पुढारी

भाजपचे तीन उमेदवार जाहीर; विधान परिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे गटासोबत युती

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : येत्या ३० जानेवारी रोजी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातून मुख्याध्यापक संघाचे ज्ञानेश्वर म्हात्रे, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून किरण पाटील तर अमरावती पदवीधर मतदारसंघातून माजी राज्यमंत्री रणजित पाटील हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. या निवडणुकीत भाजप- शिंदे गटाची युती झाली आहे. मात्र जाहीर झालेल्या तीनही ठिकाणी भाजपचे उमेदवार देण्यात आले आहेत. यावेळी शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण पावसकर उपस्थित होते.

नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षक मतदारसंघातून अजून उमेदवार जाहीर केले नसले तरी नागपूरची जागा ही भाजप शिक्षक परिषदेला सोडणार असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले. शक्यतो विद्यमान आमदार ना. गो. गाणार यांच्या उमेदवारीला पसंती मिळण्याची शक्यता आहे.

यावेळी बावनकुळे म्हणाले, राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले असून हे सरकार वेगाने कामे करीत आहे. राज्याचा विकास करताना विविध समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे राज्याला अभिप्रेत असे सरकार आल्याने राज्यातील जनता खूश असून भाजप विधान परिषद निवडणुका जिंकून दाखवेल, असा दावा केला. कोकण शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना भाजपचा एबी फॉर्म देण्यात येणार असल्याने ते भाजपचे उमेदवार असतील. कोकणात एका पक्षाची ताकद असल्याचे मानले जाते. पण भाजप- शिंदे गटाच्या युतीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक आम्ही जिंकून दाखवू, असा दावा बावनकुळे यांनी केला. तर उदय सामंत यांनीही कोकणातील ही निवडणूक आम्ही शंभर टक्के जिंकू, असे सांगत ज्ञानेश्वर म्हात्रे हे आजच विजयी झाल्याचे मी जाहीर करतो, असे सांगितले.

अनिल बोरनारे यांचा पत्ता कट

कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजप प्रणीत शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या नावाची चर्चा होती. आतापर्यंत ही निवडणूक भाजप ऐवजी शिक्षक परिषदच लढत आली आहे. मात्र, भाजपने बोरनारे यांचा पत्ता कट करून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना आपली उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडी पुरस्कृत शेकापचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्याशी रंगणार आहे. यावेळी शिक्षक परिषद शिक्षकांसाठी असलेल्या तीन पैकी केवळ नागपूर शिक्षक मतदारसंघ या एकाच जागेवर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित दोन ठिकाणी भाजप निवडणूक लढविणार आहे.

Back to top button