छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मांतराला नकार दिला याला इतिहासात आधार नाही : अमोल कोल्हे | पुढारी

छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मांतराला नकार दिला याला इतिहासात आधार नाही : अमोल कोल्हे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्तीने धर्मांतर करण्यावर बंदी आणली होती; पण धर्मांतर करण्यास त्यांनी औरंगजेबाला नकार दिला याला इतिहासात काही आधार नसल्याचे अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटल्याने आता भडकलेल्या वादात आणखीच भर पडली आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हते, तर स्वराज्यरक्षक होते,’ असे वादग्रस्त
विधान केल्यानंतर राज्यात वादळ निर्माण झाले आहे. पवार यांच्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचे समर्थन केल्यानंतर आता खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांच्या नव्या विधानाने खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, ‘स्वराज्यरक्षक’ ही मालिका करत असताना मला जे जाणवले ते मी सांगतो. छत्रपती शंभूराजे यांनीच लिहिलेला ग्रंथ पाहिला, तर त्यात त्यांनी धर्माची उत्तम चिकित्सा केली आहे. त्यांनी त्यावर श्लोक रचले आहेत. जबरदस्तीने ज्यांचे धर्मांतर झाले त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी शुद्धीकरण करून हिंदू धर्मात स्वागत केले होते. संभाजी महाराजांनी नेहमी हा कित्ता गिरवला. जबरदस्तीने केलेल्या धर्मांतरावर त्यांनी बंदी आणली होती, असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिले, याचा अभ्यास केला, तर याचे काही पुरावे आहेत. इतिहास लिहिताना दोन पुरावे महत्त्वाचे असतात. समकालीन अस्सल साधने आणि उत्तरकालीन पुरावे. त्यातील खाफी खान, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना आणि साकी मुस्तेद खान या इतिहासकारांनी नोंदी केल्या आहेत. त्यामध्ये या इतिहासकारांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, औरंगजेबाने शंभूराजेंना बंदी बनवल्यानंतर स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि औरंगजेबाचे कोणते लोक शंभूराजांना सामील आहेत, हे दोनच प्रश्न विचारले होते. धर्मांतर करायला त्यांनी नकार दिला याचा कुठेही आधार नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

Back to top button