सुशांतच्या मृतदेहासोबत साक्षीदाराचा व्हिडिओ नितेश राणेंकडून जारी | पुढारी

सुशांतच्या मृतदेहासोबत साक्षीदाराचा व्हिडिओ नितेश राणेंकडून जारी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या नसून हत्याच झाली होती असा दावा कूपर रुग्णालयातील कर्मचारी रूपकुमार शाह यांनी केला होता. आता त्याच्यासोबत सुशांतसिंह राजपूतच्या मृतदेहाचा एक व्हिडीओ भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केला आहे. हे शेवटी सत्य बाहेर येत आहे. न्याय मिळेल! असे नितेश राणे यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिशा सालियनच्या मृत्यूची एसआयटी चौकशी लावण्यात आली असताना नितेश राणे यांच्या या ट्वीटने खळबळ उडाली आहे.

अभिनेता सुशांतसिंह १४ जून २०२० रोजी गळफास घेतल्याच्या स्थितीत फ्लॅटवर आढळल्यानंतर त्याचा मृतदेह अंधेरीच्या कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला होता. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या रूपकुमार शाह यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला होता. सुशांतसिंग राजपूतच्या शरीरावर आणि मानेवरही अनेक खुणा होत्या असा दावा रूपकुमारने केला होता.
सुशांतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूची फाईल पुन्हा एकदा उघडली जाणार आहे. दिशाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी व्हावी म्हणून नितेश राणे, भरत गोगावले यांच्यासह भाजप शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभेत – आक्रमक पवित्रा घेतला होता.

Back to top button