मुंबई महापालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करा, भाजप नगरसेवक आक्रमक | पुढारी

मुंबई महापालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करा, भाजप नगरसेवक आक्रमक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीसह इतर समित्यांच्या सभा आणि गटनेत्यांची सभा प्रत्यक्षपणे सुरु करण्यासाठी आज भाजपाने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. भाजप नगरसेवकांनी आभासी सभा नको, प्रत्यक्ष सभा घेण्याची मागणी करणारे पोस्टर झळकावत, आपली मागणी रेटून धरली. याशिवाय आभासी बैठकांना दांडी मारत भाजप नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवत आपला निषेध नोंदवला आहे.

याआधी कालच भाजप नगरसेवकांनी महापालिकेत धरणे आंदोलन करून आपली मागणी लावून धरली होती. मुंबई महापालिकेत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बोकाळत असल्याचा आरोप भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

तसेच भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपण्यासाठीच सत्ताधारी पक्षाकडून आभासी बैठका घेत असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पत्रकारांनाही आभासी बैठकांपासून दूर ठेवले जात असल्याने भाजपाचे शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आजच्या महापालिका सभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व ८३ नगरसेवकांनी आभासी बैठकीद्वारे होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी आभासी बैठका बंद करा, प्रत्यक्ष बैठका घ्या अशा आशयाचे काळे फलक घेऊन तीव्र निदर्शने केली.

तसेच सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही. याशिवाय आजच्या प्रभाग समिती बैठकामध्ये सत्याग्रह करत भाजप नगरसेवक प्रत्यक्ष उपस्थित राहिलेत.

Back to top button