तुकडे तुकडे गँग मुंबईची शकलं शकलं करतील : आशिष शेलार | पुढारी

तुकडे तुकडे गँग मुंबईची शकलं शकलं करतील : आशिष शेलार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे लोक हेच स्वतः तुकडे तुकडे गँग आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजे काय? तर तुटून उरलेली शिवसेना, तुटून आलेली काँग्रेस, तुटून आलेली राष्ट्रवादी आहे. पहिला तुकडा मूळ काँग्रेसमधून तुटून आलेला काँग्रेस (आय), दुसरा तुकडा काँग्रेसमधून तुटून आलेली राष्ट्रवादी काँग्रेस, तर तिसरा तुकडा वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेपासून तुटून आलेली उद्धवजी यांची शिवसेना आहे. त्यांना अजून तुकडे हवेत. ही तुकडे तुकडे गँग मुंबईची शकलं करेल, अशी घणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

जागर मुंबईचा अभियानांतर्गत २५ वी जाहीर सभा विलेपार्ले विधानसभेत दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे रविवारी (दि.११) पार पडली. या सभेला माजी नगरसेविका ज्योती अळवणी, सुशम सावंत, वीरेंद्र म्हात्रे, राजेश मेहता, स्वप्ना म्हात्रे, सुनीता मेहता, अनिष मकवाणी, अभिजित सामंत, प्रकाश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आशिष शेलार म्हणाले, मतासाठी कुर्निसात घालणे हे भाजपाला मान्य नाही. कोरोना काळात मुंबईकरांच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केले जाते. उद्धव ठाकरे दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज्यांकडे पुरावे मागितले जातात. औरंगजेबाचे स्वप्न उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले.
समाजात तेढ निर्माण होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. २२ ऑक्टोबरला सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत, असे लिहिले गेले. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम मराठी अशी मांडणी केली जात आहे. मराठी- गुजरातीला विरोध का? मराठी-जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक टेंडरमध्ये पैसे खाण्याचे काम केले. प्रत्येक वार्डात शिवसेनेकडून (ठाकरे गट) मराठी आणि मुस्लिम मतांचे गणित जुळवले जात आहे. सलग २५ वर्ष राज्य करून तुम्हाला जाती धर्माच्या आधारावर मते मागण्याची वेळ का आली? केलेल्या कामाच्या आधारावर मते मागा? सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? असे सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केले.

मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा डाव हा रडीचा म्हणजेच कलीचा डाव खेळला जात आहे. जाती आणि धर्माच्या आधारावर मते मागण्याचा कार्यक्रम हा अजेंडा उद्धव यांच्या शिवसेनेचा आहे. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम सुरू आहे. हिंदू मराठी आणि मुस्लिम मते भारतीय जनता पार्टीला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचलंत का?

Back to top button