काशिद समुद्रात दोन पर्यटकांचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले - पुढारी

काशिद समुद्रात दोन पर्यटकांचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले

रायगड; पुढारी वृत्तसेवा : मुरुडमधील प्रसिद्ध काशिद समुद्रात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पोहायला उतरलेल्या या तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.

ही बाब किनार्‍यावरील जीवरक्षकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दोन्ही पर्यटकांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.

लालटू नस्कर (वय 28) व पालटू सूत्रधर (वय 38) अशी बुडालेल्या पर्यटकांची नावे आहेत. आज दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हे दोघे पर्यटक मूळचे कोलकाता येथील असून, पुण्यात ते कामाला होते.

काम करीत असलेल्या ठिकाणच्या अन्य सहकारी कर्मचार्‍यांसह दोन बसेसमधून हे पर्यटक काशिदला फिरायला आले होते. या पर्यटकांना किनार्‍यावरील जीवरक्षकांनी समुद्रात न उतरण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या.

त्यामुळे एका बसमधील पर्यटक समुद्राच्या पाण्यात उतरले नाहीत. मात्र सूचना करुनही दुसर्‍या बसमधील लालटू नस्कर व पालटू सूत्रधर हे समुद्राच्या पाण्यात उतरले. या दोघांनाही समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने, ते पाण्यात बुडाले.

हे दोघेही पाण्यावर तरंगत असल्याची बाब, जीवरक्षक अमोल कासार यांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना पाण्याबाहेर काढत किनार्‍यावर आणले. मात्र दोघेही बेशुद्धावस्थेत होते.

जीवरक्षक अमोल कासार यांनी एटीव्ही बाईकवाले आणि घोडेचालकांच्या मदतीने तातडीने दोघांनाही बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, जीवरक्षक, स्थानिक ग्रामस्थांनी सूचना करुनही उत्साहाच्या भरात समुद्रात उरतणे या पर्यटकांच्या जीवावर बेतले आहे.

हे ही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button